Omicron: लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉनची लागण; महाराष्ट्रात स्थिती गंभीर, ५४ रुग्णांपैकी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:25 PM2021-12-21T12:25:35+5:302021-12-21T12:26:16+5:30
ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. कोरोना लस घेतलेलेही ओमायक्रॉनच्या विळख्यात अडकत आहेत
नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेनंतर आता ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार? यातून कसं वाचणार? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडले आहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे कोरोना लस घेतलेले ओमायक्रॉन संक्रमित होत आहेत. भारतात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २०० च्या वर गेली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. याठिकाणी ८१ टक्के ओमायक्रॉन रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. कोरोना लस घेतलेलेही ओमायक्रॉनच्या विळख्यात अडकत आहेत. ज्यांना याआधीही कोरोना झाला आहे असेही कोरोना संक्रमित होत आहेत. त्यामुळे अधिक सतर्क राहणं गरजेचे आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) म्हटलं आहे. महाराष्ट्रात ५४ रुग्णांपैकी ८१ टक्के ब्रेक थ्रू इंफेक्शन प्रकरणं आहेत म्हणजे लसीकरणानंतरही संक्रमित झाले आहेत. इतकचं नाही तर काही जणांनी फायझर लसीचा तिसरा डोसही अर्थात बूस्टर डोस घेतला होता. त्यांनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. दिलासादायक म्हणजे या रुग्णांची स्थिती गंभीर नसून अनेकांमध्ये केवळ सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. लस ओमायक्रॉनचं संक्रमण रोखण्यास अपयशी ठरतेय का? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. परंतु लसीकरण झालेल्यांना त्याचा जास्त धोका नसतो हेदेखील सत्य आहे.
तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंट इम्युन रिपॉन्सपासून वाचू शकतो अशावेळी बहुतांश लसी ओमायक्रॉनच्या ट्रान्समिशनला रोखू शकत नाहीत. परंतु लस घेतलेल्या लोकांना गंभीर आजारापासून वाचवू शकते. महाराष्ट्रात ५४ पैकी ४४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. लस न घेतलेल्या १० लोकांपैकी २ वयस्क आणि ८ अल्पवयीन आहेत. नागपूरात एका व्यक्तीला एप्रिलमध्ये कोविड झाला होता त्याला पुन्हा ओमायक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित केले आहे.
लस ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी प्रभावी नाही, पण...
पुणे येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च डॉ. विनीता म्हणाल्या की, कोव्हॅक्सिन, कोविशील्ड यांच्यासह अधिक लसी ट्रान्समिशन रोखण्यास सक्षम नाहीत. इंट्रामस्कुलर इंजेक्शनद्वारे लसीचे डोस दिले गेलेत. व्हायरस प्रवेश करणाऱ्या जागेवर त्यांचा प्रभाव राहतो परंतु तो इतका ताकदीचा नसतो की त्यामुळे व्हायरस नष्ट होऊ शकेल. जरी व्यक्तीच्या शरीरात अँन्टिबॉडी असतील तरी काही व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतात.