स्तनांचा कर्करोग आता विशीच्या उंबरठ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 12:34 PM2019-11-06T12:34:16+5:302019-11-06T12:41:53+5:30

बदलती जीवनशैली ठरतेय घातक : जंकफूड, मद्यपान आणि धूम्रपानाचा परिणाम 

Breast cancer is now at in the youth level | स्तनांचा कर्करोग आता विशीच्या उंबरठ्यावर 

स्तनांचा कर्करोग आता विशीच्या उंबरठ्यावर 

Next
ठळक मुद्देस्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण २० ते ३० वयोगटामध्ये २ वरून ४ टक्के ३० ते ४० वयोगटातल्या महिलांमधील प्रमाण ७ वरून १६ टक्के ४० ते ५० वयोगटामधील प्रमाण हे २० वरून २८ टक्क्यांपर्यंत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिकस्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण २० ते ३० वयोगटामध्ये २ वरून ४ टक्के

नम्रता फडणीस / 
प्रज्ञा केळकर-सिंग। 

पुणे : पन्नास-साठ वयोगटातील महिलांना भेडसावणारा स्तनांचा कर्करोग आता विशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विशीपासून सर्वच वयोगटातील महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा असून, महिला वेळीच सावध न झाल्यास आगामी पाच वर्षांमध्येच हे प्रमाण झपाट्याने वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 
स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण २० ते ३० वयोगटामध्ये २ वरून ४ टक्के, ३० ते ४० वयोगटातल्या महिलांमधील प्रमाण ७ वरून १६ टक्के, तर ४० ते ५० वयोगटामधील प्रमाण हे २० वरून २८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. निमिष जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
ऑक्टोबर महिना ‘स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती महिना’ म्हणून पाळला जातो. स्तनांचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग मानला गेला आहे. जगभरात २.१ दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात, स्तनांचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगाचा प्रकार आहे, ज्यामध्ये दर १ लाख  महिलांपैकी १२.७ टक्के महिलांचा मृत्यू होत आहे. स्तनांच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे निदान होण्याबाबत जागरुकतेचा अभाव हे आहे. 
अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, स्थूलता, जंकफूडचे सेवन, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, हार्मोन्सचे असंतुलन, मद्यपान, धूम्रपान, तसेच वैद्यकीय चाचण्यांबाबत जागृतीचा अभाव, कर्करोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी जाण्याबाबत उदासीनता यामुळे महिलांमधील स्ततनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पन्नाशी आणि साठीच्या पुढे बळावणारा कर्करोग आज वीस ते तीस वर्षांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. 
.........
‘लोकमत’ प्रतिनिधीने गृहिणी, प्राध्यापिका, आयटी इंजिनिअर, वकील अशा विविध स्तरांतील सुमारे २५ महिलांशी संवाद साधला. ३०-३५ वयोगटांतील सुमारे २५ महिलांना विचारणा केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २५ पैकी २१ महिलांनी आजवर कधीच स्तनांच्या कर्करोगाची तपासणी केली नसल्याचे सांगितले. कर्करोगाची लक्षणे, घरच्या घरी करावयाची तपासणी याबाबतही त्या अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
...
अनुभव 
गीता सिन्हा (नाव बदललेले) या महिलेची ४२ व्या वर्षीच रजोनिवृती झाली. त्यामुळे डॉक्टरांनी तिला वेळोवेळी स्तनाच्या कर्करोगाची नियमित तपासणी करण्यास सांगितले. कमी वयातच रजोनिवृतीला पोहोचल्याने तिला स्तनांच्या कर्करोगाचा धोका असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. मात्र तिने दुर्लक्ष केले. जेव्हा गीता ५२ वर्षांची झाली, तेव्हा तिने केलेल्या चाचणीतून स्तनांचा कर्करोग असल्याचे निदान झाले. पण वेळीच उपचार करण्यात आल्याने गीता आता या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे. गीताच्या घरातही तिच्या मावशीला कर्करोगाचे निदान झाले असून या आजारामुळे त्यांना जीव गमवावा लागला होता. फॅमिली हिस्ट्री असलेल्या महिलांनी वर सांगितल्याप्रमाणे नियमित चाचण्या या कराव्यातच, पण जेनेटिक टेस्टिंगचीदेखील माहिती करून घ्यावी.
........
स्तनांची तपासणी कशी करावी? 
स्तनांचा कर्करोग आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी २० व्या वर्षापासूनच महिन्यातून एकदा स्वत:चे स्तनपरीक्षण अर्थात ‘सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन’ करावे. स्तनांतील गुठळ्या, सूज येणे, गाठ होणे, त्वचेचे निस्तेज होणे अथवा रंग बदलणे, स्तनाग्रांचा आकार बदलणे यांसारख्या बदलांचे परीक्षण करावे. यामुळे स्तनांच्या कर्करोगाचे निदान केले जाऊ  शकते. यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. ३० वर्षांपासून डॉक्टरांकडून स्तनांची वार्षिक तपासणी (क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम) करून घेणे आवश्यक आहे. ४० वर्षांपासून अधिकृत केंद्रात जाऊन, वार्षिक मॅमोग्राफीची तपासणी करणेही तितकेच आवश्यक आहे. ४० वर्षांखालील वयाच्या स्त्रियांसाठी तक्रारीच्या निदानासाठी, अगोदर स्तनाची सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते. सोनोग्राफीमध्ये एक्स-रे न वापरता, ध्वनीलहरींचा वापर होतो. वय ४० पेक्षा अधिक असल्यास, आधी मॅमोग्राफी आणि त्यानंतर आवश्यक असल्यास सोनोग्राफी केली जाते. दोन्ही तपासण्या परस्परपूरक असून, अनेक वेळा पूर्ण निदान करण्यासाठी दोन्ही तपासण्यांचा वापर केला जातो.
............
स्तनांचा कर्करोग टाळ्ण्यासाठी काय करावे?
दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा. व्यायामामुळे या आजाराची शक्यता २०-३० टक्क्यांनी कमी होते. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. मेनोपॉझनंतर हॉर्मोन्सची औषधे अजिबात घेऊ नका. वजनावर नियंत्रण ठेवा. आहारात फळे-भाज्या, कडधान्ये जास्त व तेल-तूप कमी ठेवा. या सर्व गोष्टी करूनदेखील हा आजार १००% टाळता येईलच, असे नसते, हेही लक्षात ठेवा. म्हणून प्राथमिक अवस्थेत निदान करण्याची साधनेदेखील तेवढीच महत्त्वाची आहेत. 
.........
महिलांनी उपस्थित केलेले प्रश्न  
नियमित तपासणी करणे गरजेचे असते का?
कोणत्या प्रकारची तपासणी आवश्यक आहे?
स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
घरच्या घरी तपासणी कशी करायची?
.........
स्तनांना येणारी गाठ किंवा सूज
स्तनांतून होणारा रक्तमिश्रित आणि चिकट स्राव
त्वचेच्या रंगातील बदल
एका स्तनाचा आकार लहान होणे
स्तन सातत्याने दुखणे
........

Web Title: Breast cancer is now at in the youth level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.