हवाय मोकळा श्वास!
By Admin | Published: June 12, 2014 01:27 AM2014-06-12T01:27:44+5:302014-06-12T01:27:44+5:30
बालकामगार ही जागतिक समस्या आहे. नागपुरातही बालकामगारांची समस्या भीषण आहे. परंतु बालकामगारांची निश्चित आकडेवारी मात्र अजूनही उपलब्ध नाही. यशदातर्फे करण्यात आलेल्या
आज जागतिक बालकामगार दिन : उपराजधानीत दहा हजारावर बालकामगार
नागपूर : बालकामगार ही जागतिक समस्या आहे. नागपुरातही बालकामगारांची समस्या भीषण आहे. परंतु बालकामगारांची निश्चित आकडेवारी मात्र अजूनही उपलब्ध नाही. यशदातर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार नागपुरात जवळपास ४५०० बालकामगार आहेत. परंतु विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी नागपुरात सुमारे १० हजारावर बालकामगार असल्याची शक्यता वर्तविली आहे. कामगार कल्याण विभागातर्फे गेल्या वर्षभरात नागपुरात १० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात सहा मुले हॉटेलमध्ये काम करताना आढळून आली तर चार जण नक्षीकाम करण्याच्या उद्योगात होते. यापैकी एकाही बालकामगाराची सुटका झाली नाही.
कोणत्याही संस्थेत, कंपनीत, आस्थापनेत किंवा घरगुती काम करणारा मुलगा हा १४ वर्षाखालील असल्यास त्याल बालकामगार असे म्हटले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालकामगार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात कृतिदल
बालमजुरीची प्रथा ही मानव विकास व राष्ट्रीय विकासाला घातक आहे. तिचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने प्रत्येक जिल्ह्यात कृृतिदल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २५ एप्रिल २००६ साली तसा जी.आर. काढला. जिल्हाधिकारी हे या कृतिदलाचे प्रमुख असून उपसहायक कामगार आयुक्त हे सदस्य सचिव असतात. जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तसेच त्यात त्या विभागातील कार्यरत बालकामगारांशी निगडित, इच्छुक स्वयंसेवी संस्था हे सदस्य असतात.
हॉटेल क्षेत्रात सर्वाधिक बालमजूर
कोणत्या क्षेत्रात किती बालकामगार आहेत, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी नागपुरात सर्वाधिक बालकामगार हे हॉटेल उद्योगात गुंतले आहेत. याला प्रशासनासह अशासकीय संघटनाही दुजोरा देतात. कमी पगार अधिक काम आणि लहान मुले मुकाट्याने काम करीत असल्याने बालमजूर ठेवण्याला प्राधान्य दिले जाते. यानंतर विटाभट्टी, अगरबत्ती उद्योग, लग्नसमारंभात दिवे घेऊन जाणे, कचरा वेचणे, फुले व शोभेच्या वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेसमध्ये कागद वेचणे, खाणीत काम करणे, सुपारी फोडणे, रिबीन तयार करणे, पानटपरी आणि घरगुती कामासाठी लहान मुलांचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त शेती आणि विडी उद्योगातही मोठ्या प्रमाणावर बालमजूर काम करतात.
आर्थिक दंड व तुरुंगवासही
बालकामगार ठेवण्यात येऊ नयेत याबाबत अनेकदा कायदे करण्यात आलेले आहेत. परंतु ते अदखलपात्र असल्याने कामगार कल्याण निरीक्षकामार्फत याचा तपास केला जातो. बालकामगारांसंबंधी असलेल्या विशेष कायद्यानुसार पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या संस्थेला दहा हजार रुपयापर्यंत दंड आणि त्याचा मालकाला तीन महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा गुन्हा करताना आढळून आल्यास २० हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची शिक्षेची तरतूद आहे. परंतु हा कायदा अदखलपात्र असल्याने कामगार निरीक्षक स्वत: याबाबत तपास करून न्यायालयात तक्रार दाखल करतात. न्यायालयीन प्रक्रियेत विलंब होत असल्याने या कायद्याचा प्रभाव पडताना दिसून येत नाही. त्यामुळेच बाल न्याय अधिनियमनुसार बालकामगार ठेवणे हा दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे.