काशिंबेग-नारोडी रस्त्याने घेतला श्वास
By admin | Published: August 24, 2016 01:32 AM2016-08-24T01:32:36+5:302016-08-24T01:32:36+5:30
वडगाव काशिंबेग-नारोडी रस्त्याच्या कडेला असणारी व वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडेझुडपे काढण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे
मंचर : वडगाव काशिंबेग-नारोडी रस्त्याच्या कडेला असणारी व वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडेझुडपे काढण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. याची दखल घेऊन रस्त्याला अडथळा करणारी झाडेझुडपे काढण्यात आली.
मंचर येथून वडगाव काशिंबेग चिंचोडी देशपांडे मार्गे नारोडी अशा एसटीच्या दिवसभर फेऱ्या होतात. शालेय विद्यार्थ्यांना एसटीनेच प्रवास करावा लागतो. शेतमालाच्या वाहतुकीसाठीसुद्धा हा रस्ता
महत्त्वाचा होता.
रस्ता एकेरी वाहतूक होईल एवढाच असल्याने दोन वाहने एकाच वेळेला ये-जा करू शकत नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी झाडेझुडपे वाढली होती. रस्त्याने वाहन जाताना ही झुडपे अडथळा ठरत होती. विशेषत: वडगाव काशिंबेग ते चिंचोडी व तेथून पुढे नारोडीपर्यंत रस्त्याला अडथळा होत होता.
एसटी बस बंद होण्याची शक्यता होती. दोन वाहने एकमेकांना पार होत नव्हती. त्यामुळे वाहनांना पुढे जाता येत नव्हते.
रस्त्याला अडथळा ठरणारी झुडपे काढून टाकण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त देण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन या रस्त्यावरील झाडेझुडपे काढून टाकण्यात आली. (वार्ताहर)
>जेसीबीच्या साहायाने रस्त्यात वाहतुकीला ठरणारी झाडे काढण्याबरोबर गवतही काढून टाकण्यात आले. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. रस्त्यावर वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. पूर्वी वळणावर झुडपे असल्याने पुढून येणारे वाहन दिसत नव्हते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती.