बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास बेदम चोप
By admin | Published: October 19, 2016 08:40 PM2016-10-19T20:40:00+5:302016-10-19T20:40:00+5:30
शिंदेवाडी (ता. मिरज) येथे बुधवारी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शानूर हाजीसाब शेख (वय ३८, रा. उगार, ता. अथणी, जि. बेळगाव)
ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 19 - शिंदेवाडी (ता. मिरज) येथे बुधवारी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शानूर हाजीसाब शेख (वय ३८, रा. उगार, ता. अथणी, जि. बेळगाव) या तरुणास ग्रामस्थांनी बेदम चोपले. त्याला ग्रामपंचायतीसमोर खांबाला बांधून महिलांनी चपलाने चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
शिंदेवाडी गावाजवळ असलेल्या ओढ्यावर दुपारी गावातील काही महिला धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. सर्व महिला परतल्यानंतर तीस वर्षीय विवाहिता एकटीच धुणे धूत होती. यावेळी तेथे आलेल्या शानूर शेख याने निर्जनस्थळी एकटीच महिला असल्याचे पाहून तिच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेस झुडुपात ओढून नेत असताना तिने आरडाओरड केल्याने तेथून जाणारे विनायक साळुंखे यांनी शेख यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेख याने मोटारसायकलवरून केंपवाडच्या रस्त्याने पलायन केले. साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला.
केंपवाड येथेही ग्रामस्थांनी अडविल्याने शेख परत शिंदेवाडीकडे आला. गावात हायस्कूलजवळ मोटारसायकल टाकून शेतात शिरलेल्या शेखला ग्रामस्थांनी पकडले. यावेळी मोठा जमाव जमला होता. त्याला पकडून ग्रामपंचायतीजवळच्या खांबाला बांधून घालण्यात आले. गावातील महिलांनी त्याला चपलाने चोप दिला. ग्रामस्थांनीही त्याची चांगलीच धुलाई केली.
पंचायत समिती सदस्य शंकर पाटील, दीपक पाटील, गोविंद पाटील, लक्ष्मण साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. शानूर शेख याच्याविरुध्द बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
दोन तास बांधून ठेवले
शानूर शेख याचा जनावरे भादरण्याचा व्यवसाय आहे. त्या निमित्ताने तो गावात आला होता. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचे हातपाय बांधून तब्बल दोन तास विद्युत खांबाला बांधून घालण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे त्यास सोपविण्यास ग्रामस्थांनी नकार देत, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्याचा आग्रह धरला. यामुळे पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी शिंदेवाडी येथे जाऊन शानूर शेख यास ताब्यात घेतले.