कृषी विद्यापीठाचा लाचखोर लेखाधिकारी गजाआड
By admin | Published: May 7, 2016 01:25 AM2016-05-07T01:25:42+5:302016-05-07T01:25:42+5:30
लेखापरीक्षणमधील त्रुटी टाळण्यासाठी घेतली लाच, अकोला व यवतमाळ एसीबीची कारवाई.
अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यापीठ अभियंता कार्यालयातील लेखाधिकारी जयाजी माधवराव बागडे याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. लेखापरीक्षणातील त्रुटी टाळण्यासाठी तसेच लेखापरीक्षण क्लीअर करून देण्याच्या नावाखाली बागडे याने १५ हजार रुपयांची लाच घेताच अकोला व यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एका कार्यालयातील आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी विद्यापीठ अभियंता कार्यालयाचे लेखाधिकारी जयाजी माधवराव बागडे यांच्याकडे होती. त्यामुळे संबंधित कार्यालयाचे अधिकारी बागडे यांना भेटले असता, लेखाधिकारी बागडे याने लेखापरीक्षणातील त्रुटी टाळण्यासाठी आणि लेखापरीक्षण स्पष्ट व योग्य करून देण्यासाठी सदर अधिकार्याला १५ हजार रुपयांची लाच मागितली. सदर अधिकार्याला लाच द्यायची नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला व यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून शुक्रवारी दुपारी जयाजी बागडे याने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. आरोपी जयाजी बागडे याच्याकडून १५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख उत्तमराव जाधव व यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी व कर्मचार्यांनी केली.
'पीकेव्ही'त प्रथमच अशी कारवाई
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अधिकार्यावर अशा प्रकारची कारवाई प्रथमच असल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळयात अडकण्याची ही प्रथमच वेळ असल्याचे वृत्त असून, हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे मोठे यश आहे. यवतमाळ व अकोला या दोन ठिकाणच्या अधिकार्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
एकाच दिवसात छडा
जयाजी बागडे याने शुक्रवारीच १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने शुक्रवारी दुपारीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठिकाण ठरताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी बागडे याला रंगेहाथ अटक केली.