लाचखोर कृषी अधिकारी जाळ्यात
By admin | Published: March 11, 2017 02:30 AM2017-03-11T02:30:46+5:302017-03-11T02:30:46+5:30
तब्बल तीन लाखाची मागीतली होती लाच.
वाशिम, दि. १0- पाइपचा पुरवठा करणार्या कंपनीचे देयक देण्यासाठी २ लाख ७४ हजार रूपये लाचेची मागणी करणार्या जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १0 मार्च रोजी अटक केली.
वाशिम जिल्हा परिषदेतील कृषी विभागाला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एचडीपीई या पाइप तयार करणार्या कंपनीने मार्च २0१६ मध्ये पाईपचा पुरवठा केला होता. या पाइपची एकुण किंमत १७ लाख एवढी असल्याचे बिल कृषी विकास अधिकार्यांकडे सादर केले. सदर बिल काढून देण्याकरीता कृषी विकास अधिकारी ए.जी. धापते यांनी १९ टक्के प्रमाणे ३ लाख २0 हजार रूपये एवढी लाचेची मागणी केली असल्याची तक्रारी वाशिम येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केली असता पाइपचे पुरवठादार यांना उर्वरीत बिल १७ लाख रूपये काढून देण्याकरीता १६ टक्के प्रमाणे २ लाख ७४ हजार रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराकडून कृषी विकास अधिकार्याला लाचेची रक्कम देत असताना त्याला संशय आल्याने धापते यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र लाचलूचपत विभागाच्या पथकाला धापते यांनी लाचेची मागणी केल्याची खात्री पटल्याने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.