लाचखोर एएसआय व दोन हेड कॉन्स्टेबल गजाआड
By admin | Published: July 25, 2014 12:51 AM2014-07-25T00:51:45+5:302014-07-25T00:51:45+5:30
रेल्वे पोलिस ठाण्यातील प्रकार
अकोला : जीआरपी अर्थात रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या आरोपीस सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्याच्याकडून ५00 रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह (एएसआय) दोन पोलिस हेड कॉन्स्टेबल्सना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहात अटक केली. या त्रिकुटाने आरोपीकडून यापूर्वीही २0 हजार रुपयांची लाच घेतली असल्याची माहिती एसीबीच्या अधिकार्यांनी दिली. जीआरपीमध्ये महेश करोडदे याला एका गुन्हय़ामध्ये अटक केली होती. या आरोपीला मारहाण न करणे, तसेच त्याला विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी जीआरपीचे एएसआय शेख अनवर शेख अली, पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल मनोहर गवई आणि इरफान अजीजखान पठाण यांनी १0 हजार रुपयांची लाच मागितली होती. महेश करोडदे याने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. एसीबीने सापळा रचला आणि लाच दोन ते तीन टप्प्यात देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार २४ जुलै रोजी महेश करोडदे हा एएसआय शेख अनवर शेख अली याला ५00 रुपयांची लाच देताना एसीबीने छापा मारून त्याला अटक केली. यात पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल मनोहर गवई आणि इरफान अजीजखान पठाण हेदेखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.