लाचखोर गणेश बोराडे यांचे दुसऱ्यांदा निलंबन अटळ
By Admin | Published: November 8, 2016 02:10 AM2016-11-08T02:10:53+5:302016-11-08T02:10:53+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहायक आयुक्त व ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांचे लाचखोरीप्रकरणात दुसऱ्यांदा निलंबन अटळ आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहायक आयुक्त व ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांचे लाचखोरीप्रकरणात दुसऱ्यांदा निलंबन अटळ आहे. त्यांच्याविरोधात मंगळवारी निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेत मोठे फेरबदल होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
बेकायदा बांधकाम प्रकरणात बोराडे यांना शनिवारी ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने दीड लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. सध्या बोराडे हे पोलीस कोठडीत आहेत. कल्याण न्यायालयाने त्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. लाचप्रकरणात अटक झालेले बोराडे हे नियमानुसार महापालिका सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित होणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिकेला अहवाल सादर झाल्यानंतर ही कारवाई होणार आहे. यापूर्वी बोराडे यांना १ फेब्रुवारी २०१४ ला देखील लाच घेताना अटक झाली होती. तेव्हाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे आता पुन्हा लाचप्रकरणात दुसऱ्यांदा त्यांचे निलंबन होणार आहे. (प्रतिनिधी)