सैन्यभरतीच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक
By admin | Published: May 27, 2015 12:54 AM2015-05-27T00:54:38+5:302015-05-27T01:00:10+5:30
दोघांविरोधात गुन्हा : भरतीचे बनावट पत्र देऊन १२ जणांना गंडा
गडहिंग्लज : सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून १२ जणांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन भरतीबाबत बनावट पत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गडहिंग्लज पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल झाला. जयसिंग पालकर (रा. हरळी बुद्रक , गडहिंग्लज) आणि संदीप अर्जुन बडदे (रा. एळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांतील माहितीनुसार, हरळी बुद्रुक येथील सखाराम दत्तात्रय पाटील यांनी आपला मुलगा स्वप्निल यास फेब्रुवारी २०१४ मध्ये कवठेमहांकाळ येथे भरतीसाठी नेले होते. त्यावेळी हरळी येथील नातेवाईकांच्या भरतीसाठी आलेल्या जयसिंग पालकर यांच्याशी पाटील यांचे बोलणे झाले. यावेळी पालकर यांनी आपल्या ओळखीचे संदीप बडदे हे पैसे घेऊन मुलांना सैन्यभरती करीत असल्याचे आणि आपल्या मुलाचीही भरती केल्याचे सांगितले. त्यांच्या विश्वासावर पाटील यांनी संदीपसह मोहन तमनागोळ (रा. मलगेवाडी, ता. चंदगड) आणि अमोल पाटील (रा. वाघराळी, ता. गडहिंग्लज) यांच्या भरतीसाठीचे प्रत्येकी १ लाख प्रमाणे ३ लाख रुपये हरळी येथे पालकर यांना रोख दिले.
त्यानंतर महिन्याभरात तीनही मुलांना सैन्यभरती झाल्याचे आणि भोपाळ येथे हजर होण्याचे आदेश पत्र पालकर याने आणून दिले. त्यामुळे प्रत्येकी २ लाखांप्रमाणे सहा लाख रुपये कोल्हापूर येथे बडदे यास त्यांनी दिले. तसेच अन्य कुणाला भरती करावयाचे असल्यास प्रत्येकी तीन लाख देण्यास सांगितले. त्यानंतर विशाल तोडकर (रा. हरळी बुद्रुक), अंकुश येसरे (रा. गडहिंग्लज), रफीक कुंदरगी (हलकर्णी), निखील दुबाळ (रा. धुळगाव, ता. तासगाव), रवींद्र खुळे (रा. गजरगाव), शाम गुरव (रा. गजरगाव) आणि चंद्रकांत सोले (रा. एरंडोल) अशा नऊ मुलांनी सुद्धा पालकर यांच्यामार्फत संदीप बडदे यास प्रत्येकी ३ लाखांप्रमाणे पैसे दिले.
दरम्यान, आॅक्टोबर २०१४ मध्ये पत्रानुसार अहमदनगर येथे भरतीसाठी गेलेल्या संदीप पाटील यास भरतीचे पत्र बनावट असल्याचे कळल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. सखाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून जयसिंग पालकर आणि संदीप बडदे यांच्याविरोधात एकूण ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)