लाचप्रकरणी मंत्री खडसेंना क्लीन चिट
By Admin | Published: May 24, 2016 03:07 AM2016-05-24T03:07:37+5:302016-05-24T03:07:37+5:30
३० कोटी रुपयांच्या कथित लाच प्रकरणाशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कोणताही संबंध नाही, असा साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारला
मुंबई : ३० कोटी रुपयांच्या कथित लाच प्रकरणाशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कोणताही संबंध नाही, असा साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारला सादर केला असून, एकप्रकारे एसीबीकडून मंत्री खडसे यांना मिळालेली ‘क्लीन चिट’ असल्याचे मानले जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील एका जमीन व्यवहारासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विश्वस्त रमेश जाधव यांच्याकडे ३० कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मंत्री खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटील यास एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने राजकीय खळबळ उडाली. या प्रकरणात मंत्री खडसे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती.
या आरोप-प्रत्यारोपानंतर एसीबीने या प्रकरणासंबंधी नुकताच आपला साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) सरकारला सादर केला असून, त्यात मंत्री खडसे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे.
तक्रारदार जाधव व आरोपी पाटील यांच्यातील १२ संभाषणांचे रेकॉर्डिंग आमच्याकडे असून, त्यात खडसे यांचा ओएसडी (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) उन्मेष महाजन आणि स्वीय सहायक शांताराम भोई किंवा अन्य कर्मचारी वर्ग यांच्याशी आरोपी गजानन पाटील याचा थेट संपर्क झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. शिवाय, तक्रारदार जाधव याच्याकडे खडसे किंवा त्यांच्या कर्मचारी वर्गापैकी कोणी लाच मागितली असे सूचित करणारा कोणताही पुरावा इथपर्यंत तरी नाही, असे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या शनिवारी (२१ मे) गुन्हे शाखेनेही अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कथित फोनकॉल्सच्या आरोपाबाबत खडसे यांना क्लीन चिट दिली
होती. (विशेष प्रतिनिधी)