वधू@५३ तर वर@५५... झाले शुभमंगल
By admin | Published: March 4, 2016 01:43 AM2016-03-04T01:43:49+5:302016-03-04T01:43:49+5:30
‘म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते,’ त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. ३० वर्षांहून अधिक काळ परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे एक जोडपे पन्नाशी उलटल्यावर गुरुवारी विवाहबंधनात अडकले.
ठाणे : ‘म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते,’ त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. ३० वर्षांहून अधिक काळ परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे एक जोडपे पन्नाशी उलटल्यावर गुरुवारी विवाहबंधनात अडकले. निमित्त होते सामूहिक विवाह सोहळ्याचे. त्याचा मुहूर्त साधत तब्बल १०८ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. या जोडप्यांबरोबर दृष्टिहीन, दिव्यांग, आदिवासी, गरीब जोडप्यांवरही अक्षता पडल्या.
हिंदी भाषा एकता परिषद, राजस्थानी सेवा समिती आणि ब्रह्म फाउंडेशनतर्फे ठाण्याच्या मॉडेल मिल मैदानात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून ही जोडपी येथे आली होती. सोहळ्याला प्रारंभ होण्याआधी विधिवत पूजा करण्यात आली. आचार्य सुभाष शर्मा यांच्या उपस्थितीत हा सामूहिक विवाह सोहळा झाला. अनेकांचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते.
पन्नाशी ओलांडलेल्या एका जोडप्याने सांगितले की, गेली ३० वर्षे आम्ही परस्परांवर प्रेम केले. मात्र मुलीच्या घरातून लग्नाला विरोध होता. लग्न केले तर जीव देऊ, अशी धमकी तिच्या माता-पित्याने दिली होती. त्यामुळे इतकी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यावर आता विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. यातील वराचे वय ५५ वर्षे तर वधूचे वय ५३ वर्षे आहे. ज्यांना नातलग नव्हते, त्यांच्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांनी कन्यादानासह विधी पार पाडले. दृष्टिहीन, आदिवासी, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशी १०८ जोडपी एकाच मांडवात विवाहबद्ध झाली. संस्थेतर्फे या जोडप्यांना भांडी, मंगळसूत्र, कपडे आदी वस्तू देण्यात आल्याचे संयोजक अॅड. बी.एल. शर्मा यांनी सांगितले. या वेळी ओमप्रकाश शर्मा व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दृष्टिहीन जोडपे झाले विवाहबद्ध
सुनीता अहिरे (३०) आणि गणेश शिंदे (४०) हे दृष्टिहीन जोडपेही या सोहळ्यात विवाहबद्ध झाले. उशिरा का होईना आमचे लग्न होत आहे, याचा आनंद असल्याची भावना या जोडप्याने व्यक्त केली. आमच्या आईवडिलांनीच हे लग्न ठरविले होते, असे सांगत सुनीता म्हणाली, माझ्या वडिलांचे निधन झाल्याने दोन वर्षे हे लग्न लांबले. सुनीता ही नगरची असून गणेश मुंबईचा आहे.
सुरुवातीला आम्हाला अशा पद्धतीचा सोहळा होणार आहे, याची कल्पना नव्हती. परंतु, ओळखीतून समजल्यावर लगेच नोंदणी केली. माझ्या भावाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. माझेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच लागले आहे. हा सोहळा हाच चांगला योग असल्याने या दोघांचा विवाह येथे लावण्याचे निश्चित केले.
- कामिनी जोबनपुत्रा, वराची बहीण