काशिद गावाजवळ पुल गेला वाहून; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:01 PM2021-07-12T13:01:09+5:302021-07-12T13:01:51+5:30
काही दिवसांपूर्वीच या पुलाला मोठे विवर पडले होते. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने ही दुर्घटना घडली.
मुरुड जंजिरा : अलिबाग मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील जुना पूल पावसात रविवारी सायंकाळी वाहून गेला. यावेळी पुलावरून जाणरी एक कार आणि दोन दुचाकी खाली कोसळल्या. कारमधील सर्वाना वाचवण्यात आले. तर दुचाकीवरील एकजण वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला.
मुरुड तालुक्यात पावसाची संततधार सुरु असून नदीत आलेल्या पाण्याच्या जोरदार माऱ्याने अलिबाग-मुरुड मार्गावरील काशिद गावाजवळील पन्नास वर्षाचा जीर्ण पुल वाहून गेला. यावेळी पुलावरून दोन दुचाकी तसेच कार जात होती. त्या गाड्या खाली कोसळल्या. अलिबाग मुरुड रस्ता बंद झाल्याने आता मुरूड येथून अलिबाग जाण्यासाठी सुपेगाव मार्गे रेवदंडा असा वळसा घेऊन प्रवास करावा लागणार आहे.
काशीद येथील हा पुल जीर्ण झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी काही वर्षांपासून केली जात होती. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी ही दुर्घटना घडली.
प्रसंगावधान दाखवून वाचवले जीव
मुरूड तालुक्यातील काशीद येथे असलेला जुना पुल काल रात्री ८ वाजता कोसळला या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली. यावेळी अलिबाग मांडवी मोहल्ला येथे राहणारा अरमान शेहनवाज सय्यद हा युवक वाहून गेला होता. मात्र त्याला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला व त्याने प्रसंगवधान दाखवत ऑल्टो कारची काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून समयसूचकता दाखवत जीवदान दिले.