कुंडलिका नदीवरील पुलाचा कठडा तुटला
By Admin | Published: June 27, 2016 02:11 AM2016-06-27T02:11:52+5:302016-06-27T02:11:52+5:30
कुंडलिका नदीवरील संरक्षक कठडा मागील वर्षी उद्ध्वस्त झाल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
रोहे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथील कुंडलिका नदीवरील संरक्षक कठडा मागील वर्षी उद्ध्वस्त झाल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. तर उद्ध्वस्त कठड्यामुळे येथील अपघाताचा धोका मात्र कायम राहिला आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने तर येथील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
कोलाड नाका हा राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती नाका असल्याने या नाक्यावर नेहमीच रहदारी असते. याचबरोबर वाहतूककोंडीची समस्याही येथे भेडसावत असते. पर्यायाने या पुलावर रहदारी व वाहतूककोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. सततची वाहतूककोंडी, अरुंद पूल व पुलाचे उद्ध्वस्त झालेले संरक्षक कठडे आदी बाबी येथे अडथळा ठरत आहेत. तर अरुंद पुलामुळे येथे वाहनांच्या धडका लागून पुलाचे संरक्षक कठडेही उद्ध्वस्त होत आहेत. पुलावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला असूनही संबंधित यंत्रणेने मात्र याबाबत दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणच्या उद्ध्वस्त कठड्यातून रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने एक प्रवासी वाहन थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली होती. अशी घटना घडूनही संबंधित यंत्रणेमार्फत मात्र दुर्लक्ष होतानाचे दिसत आहे. तर अपघातग्रस्त संबंधित पुलाच्या शेजारीच मागील पाच वर्षांपूर्वी नव्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु तेही काम अर्धवटच स्थितीत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने पुलावर होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.