नागेश्वरी नदीवरील पुलाची दुरवस्था
By Admin | Published: August 23, 2016 02:57 AM2016-08-23T02:57:27+5:302016-08-23T02:57:27+5:30
महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे.
दासगाव : महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे. हा पूल ब्रिटीशकालीन नसला तरी पुलाची बिकटावस्था झाली आहे. पुलाच्या दुरूस्तीची मागणी अनेक वेळा करूनही न झाल्याने आता हा पूल नव्यानेच बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.
म्हाप्रळ -पंढरपूर मार्ग हा महाड तालुक्यातून जातो. महाडमधील खाडीपट्टा भागातील चिंभावे, तुडील, सव अशी गावे जोडत हा मार्ग महाडजवळ राजेवाडी गावालगत महाड भोर मार्गाला जोडला गेला आहे. म्हाप्रळ पंढरपूर राज्यमार्ग झाल्यापासून हा पूल अस्तित्वात आहे. दादली याठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाच्या समकालीन हा पूल आहे. या पुलावरून रत्नगिरी जिल्हयातील गावांकडे जाणारी वाहने तसेच महाड आणि पुणे येथे जाणाऱ्या वाहनांबरोबरच महाडकडे येणारी छोटी वाहने मोठयाप्रमाणात ये-जा करीत असतात. पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात या पुलावरून कायम नागेश्वरी नदीचे पाणी जाते. यामुळे खाडीपट्टा विभागातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटतो.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुलाचे कठडे देखील वाहून गेले आहेत. याठिकाणी कायम खाडीचे खारे पाणी असल्याने आणि या खाडीतून येणाऱ्या रसानमिश्रीत पाण्यामुळे पुलाच्या खांबांचे नुकसान झाले आहे. वरील सिमेंट निघून गेले असून आतिल लोखंडी सळया गंजून बाहेर आल्या आहेत. यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे.
म्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्टयातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठया प्रमाणावर विट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरून पावसाळयात नदीच्या पुराने पाणी देखील जाते. यामुळे पावसाळयात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते. दोन जिल्हयांना जोडणारा हा मार्ग कायम वर्दळीचा असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. या पुलाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायम प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
(वार्ताहर)
>पुलाची उंची कमी
म्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग दोन जिल्हयांना जोडणारा राज्यमार्ग आहे. असे असून देखील या मार्गाकडे आणि रावढळ येथील पुलाकडे संबंधित विभाग कायम दुर्लक्ष करीत आले आहे. या पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात खाडीपट्टयातील लोकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत आता दुरूस्ती नको तर पुल नवीन बांधला गेला पाहिजे, असे रिपाइ तालुका सरचिटणीस लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.