कालव्यावरील पुलास तडे
By admin | Published: March 2, 2017 01:13 AM2017-03-02T01:13:55+5:302017-03-02T01:13:55+5:30
लक्ष्मी कॉलनीमधील कालव्यावरील पुलास दोन्ही बाजूस तडे गेले आहेत.
हडपसर : लक्ष्मी कॉलनीमधील कालव्यावरील पुलास दोन्ही बाजूस तडे गेले आहेत. त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे. सोलापूर व सासवड रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी व नागरिकांना सोयीस्कर असा हा रस्ता आहे. त्या रस्त्यावरील कालव्यावरील पूल आहे.
सातववाडी, गोंधळेनगर व गंगानगरमधून सोलापूर रस्त्याला जाण्यासाठी हा रस्ता आहे. त्यामुळे सासवड रस्त्याने गाडीतळमार्गे लक्ष्मी कॉलनीत जाण्यापेक्षा या रस्त्याने गेल्यास लवकर पोहोचता येते. तशीच परिस्थिती गंगानगर व सातववाडी येथीलही आहे. या तीन्ही ठिकाणहून सोलापूर रस्त्याला जाण्याचा जवळच मार्ग हा आहे.
या रस्त्यातील काही रस्त्याचे पालिकेकडून सिमेंटीकरण सुरू आहे. मात्र, कालव्यावरील पुलाच्या एका बाजूस रस्त्यावर पूर्णपणे तडे गेल्याचे दिसते, तर पुलाच्या दोन्ही बाजूचे दगड निसटल्याचे दिसते. त्याप्रमाणे दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्या कचऱ्यामुळे कालव्यातील पाणीही दूषित होत आहे. शेजारी गार्डन आहे. तेथे सकाळ-संध्याकाळ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे धोकादायक पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)