मढ-वेसावे खाडीवर पूल झालाच पाहिजे
By admin | Published: May 4, 2015 02:03 AM2015-05-04T02:03:02+5:302015-05-04T02:03:02+5:30
वेसावे-मढ येथील आरामदायी पर्यायी फेरी बोटीचे रविवारी वेसावे बंदरावर राज्याचे शिक्षणमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
मनोहर कुंभेजकर, वेसावे
वेसावे-मढ येथील आरामदायी पर्यायी फेरी बोटीचे रविवारी वेसावे बंदरावर राज्याचे शिक्षणमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी येथील स्थानिकांनी मढ-वेसावे खाडीवर पूल झालाच पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर येथे पूल बांधला जाईल, असे आश्वासन मंत्री तावडे यांनी दिले.
या मागणीसाठी मढ, भाटी, एरंगळ, धारवली, आक्सा, येथील सुमारे एक हजार ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देऊन जोरदार निदर्शने केली. त्यामुळे येथील फेरीबोट सेवा तीन तपास बंद पडली होती. मंत्री तावडे यांनी आश्वासन दिल्यानंतर ही सेवा पूर्ववत झाली, अशी माहिती मढ वेल्फेअर फाउंडेशनने ‘लोकमत’ला दिली. या वेळी तावडे म्हणाले की, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर या ठिकणी पूल बांधण्यासंदर्भात या परिसरातील संबंधित कोळी बांधवांची बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीतच या मागणीवर सविस्तर चर्चा करून मार्ग काढला जाईल.
खाडीवर पूल बांधल्यास येथील सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांना चांगल्या शाळा आणि महाविद्यालये उपलब्ध होतील.तसेच कूपर, केइेएम, जेजे हॉस्पिटलदेखील जवळ येतील. मढ - वेसावे हे रस्त्याने सुमारे २० किमी अंतर कापण्यासाठी एक तास लागतो. या खाडीवर पूल बांधल्यास मढ -वेसावे हे अंतर ५ मिनिटांत पूर्ण करता येईल. येथील कोळी बांधवांचा मासेमारी व्यवसाय असल्यामुळे बर्फाच्या प्रति टनाला सुमारे ३५० रुपये तर डिझेल तेलावर ५० रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत असल्याची माहिती आंदोलकांच्यावतीने मढ वेल्फेअर फाउंडेशनने यावेळी तावडे यांना दिली.