शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 02:07 PM2020-01-15T14:07:00+5:302020-01-15T14:14:02+5:30
उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा संजय राऊत यांनी घेतला जोरदार समाचार
पुणे - शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणाऱ्या उदयनराजे भोसले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले आहे.
आज पुण्यात सुरू असलेल्या लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ''उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत. भाजपाचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. मात्र एखादा महापुरुष हा सर्वांचा असतो. गणपती, विष्णू अशा दैवतांची पूजा करताना कुणी विचारायला जात नाही. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील. तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे.''असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
''आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा आम्ही नतमस्तक होतो, असेही राऊत यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांना देण्यात आलेली जाणता राजा ही उपाधीही योग्य असल्याचे ते म्हणाले. ''शरद पवार हे निश्चितपणे जाणते राजे आहेत. जनतेने त्यांना ही उपाधी दिली आहे. तशीच महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेनं त्यांना राजा मानलं. लूटमार करणारा राजा होत नाही, रक्षण करणारा राजा असतो. शिवरायांवर कुणाचाही मालकी हक्क असू शकत नाही. जो या महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, तो जाणता राजा असतो. त्यामुळे कुणीही त्यावर कुणी आक्षेप घ्यायची गरज नाही.