दिग्गजांकडून ‘डीं’च्या आठवणींना उजाळा

By Admin | Published: March 26, 2017 03:27 AM2017-03-26T03:27:18+5:302017-03-26T03:27:18+5:30

लोकमान्य टिळकांपासून ते इंदिरा गांधीपर्यंतचा काळ पाहिलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे

Bringing the memories of 'D' by the legends | दिग्गजांकडून ‘डीं’च्या आठवणींना उजाळा

दिग्गजांकडून ‘डीं’च्या आठवणींना उजाळा

googlenewsNext

मुंबई: लोकमान्य टिळकांपासून ते इंदिरा गांधीपर्यंतचा काळ पाहिलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी देशात कम्युनिझम आणला. संस्कृतचे अभ्यासक, साहित्याचे आस्वादक आणि कामगारांचे नेते असणारे डांगे कामगारांसाठी स्वत: रस्त्यावर उतरले, अशा आठवणींना राजकीय पक्षाच्या दिग्गजांनी ‘डीं’च्या आठवणींना उजाळा दिला.
कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची कन्या रोझा देशपांडे आणि जावई बानी देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एस.ए. डांगे - एक इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन दादरच्या योगी सभागृहात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या चरित्रग्रंथ प्रकाशन सोहळ््याचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, रोझा देशपांडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते. डांगे यांना भारताचा सर्वाेच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात यावे, अशीही विनंती सोहळ्यात करण्यात आली. सोहळ््याचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘आम्ही मार्क्स, लेनिन पाहिला नाही, पण डांगेच्या रूपाने आम्ही आपल्या देशात लेनिन पाहिला. ‘डी’ हे फक्त डाव्या विचारसरणीचे नव्हते, त्यांनी
सगळ््या विचारसरणी आत्मसात केल्या होत्या.
सर्व वाद (इजम) त्यांनी काळात होणाऱ्या बदलांनुसार वापरले. समाज बदल्यावर त्यांनी विचार बदलत सर्वांना सामावून घेतले. सुरुवातीच्या काळात ‘डीं’वर दगडफेक झाली, तरी दगडांना बदलायची शक्ती त्यांच्या विचारांमध्ये होती. त्यांचे विचार कधीच संपणार नाहीत, जोपर्यंत देशात गरीब माणूस आहे, तोपर्यंत त्यांचे विचार संपणार नाहीत. १९३६ ला फैजपूरच्या अधिवेशनात काँग्रेसचे सदस्य होण्यासाठी कॉ. डांगेनी प्रयत्न केले होते. त्यामुळे ते ‘काँग्रेसचे प्रॉडक्ट’ होते, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे डांगेचे पुस्तक भाषांतर करून स्वत: लेनिनने वाचले होते.’ (प्रतिनिधी)

उद्धव ठाकरे यांनी सांगितले, शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्या विचारांमध्ये मतभेद होते, पण ते भेद व्यक्तिगत पातळीवर कधीच आले नाहीत. शिवसेनेच्या अधिवेशन झाले, तेव्हा डांगे उपस्थित होते. आम्हाला नेहमीच डांगे थोर पुरुष आहेत, असे घरातल्यांनी मनावर बिंबवले होते. डांगे यांनी आपले विचार नेहमीच ठोसपणे मांडले. आताच्या पिढीने कोणाकडे पाहावे, असे व्यक्तिमत्त्व नाही आणि काय शिकावे, हे त्याहून कळत नाही. बाळासाहेबांचे प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणि डांगे हे तीन गुरू होते.

कुमार केतकर म्हणाले, अजूनही देशात, महाराष्ट्रात मोठ्या नेत्यांविषयी गैरसमज आहेत, हे नवीन नाही. लोकमान्य टिळकांच्या बाबतीतही तेच होते. डांगे यांच्यावर १९२९ रोजी राजद्रोह आणि कम्युनिस्टच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले.
त्या वेळी कोर्टाकडे मागणी करून त्यांनी कम्युनिस्ट विचारांचा खरा अभ्यास केला, तेव्हा कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. तरीही त्या वेळी तुरुंगात त्यांनी पुस्तके वाचून अभ्यास केला आणि युक्तिवाद करताना मांडले.

शरद पवार यांनी सांगितले, हे फक्त डांगेंचे चरित्र नसून, देशातील विशिष्ट कालावधीचे चित्र उभे करणारे आहे. डांगेच्या कम्युनिझमच्या विचाराला राष्ट्रवादाची किनार होती, असे सांगताना शरद पवार यांनी डांगेंची एक आठवण सांगितली. ‘वाचावे काय आणि वाचावे कसे’ या विषयावर डांगे यांचे भाषण होते. या वेळी एक तास ‘वाचावे कसे’ या विषयावर बोलले होते, हे भाषण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. टिळकांच्या ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या विचाराचा प्रभाव एका पिढीवर झाला, ही डांगेंची पिढी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डांगेंना संसदेमध्ये जाण्याची संधी मिळाली, सर्वोत्तम भाषणाच्या खंडात डांगे यांचेही भाषण समाविष्ट आहे.


संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवला
डांगे यांनी लोकमान्य टिळक ते इंदिरा गांधी असे एक शतक पाहिले. पितृऋण फेडायचे असल्यास प्रत्येक पुढाऱ्याच्या मुलींनी त्यांचे चरित्र लिहावे. त्यांनी केलेला संघर्ष, त्यांना काय करावे लागले, त्यांनी काय केले नाही, हे सर्वांपर्यंत पोहोचेल. एखादी मुलगी तिच्या वडिलांविषयी कधीच खोटे बोलणार नाही. त्यांनी १८ वर्षे तुरुंगात काढली, पण तिथेच ते अनेक भाषा शिकले, अशा आठवणींना डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांनी उजाळा दिला.

आजकाल पुुढारी तुरुंगात जात नाहीत, पण कामगारांसाठी डांगे स्वत: तुरुंगात गेले होते. माझ्या पुस्तकाचे नाव ‘आयुष्य कसे जगावे’ असा आहे. मला कोणी हा प्रश्न विचारला असता, तर मी डांगेंसारखे जगावे, असा सांगितले असते. गेल्या काही वर्षांत पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे मनोहर जोशी यांनी सांगितले.

1991 ला मुंबई विद्यापीठ डांगे ना डी. लीट देणार होते. त्या वेळी अभाविपच्या माध्यमातून आम्ही त्याला विरोध केला होता. त्याचे पापक्षालन म्हणून मरणोत्तर डी. लीट डांगे यांना दिलीच पाहिजे, असे पत्र मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिल्याचे आशिष शेलार यांनी आज सांगितले.

Web Title: Bringing the memories of 'D' by the legends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.