ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा
By admin | Published: June 7, 2017 02:01 AM2017-06-07T02:01:01+5:302017-06-07T02:01:01+5:30
ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केल्या आहेत. याकरिता महामंडळाने सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यासाठी येत्या २४ जुलैपर्यंत मुदत आहे.
पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल आहे. खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अँनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली १८३० मध्ये उभारला.
बोरघाटातील रेल्वेच्या रिव्हसिंग पॉइंट येथे या पुलाची उभारणी केली असल्याची कोनशिला पुलाच्या प्राचीनतेची साक्ष देत आहे. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेला हा प्राचीन पूल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी अडथळा ठरू लागला आहे. हा पूल पाडून या ठिकाणची वळणे काढून रस्ता सरळ झाल्यास या परिसरात होणारी वाहतूककोंडी व अपघात दोन्ही कमी होतील, असे महामंडळाचे मुख्य अभियंता एस. मुंगीलवार यांनी सांगितले. सदरचा पूल हा रेल्वेच्या ताब्यात असल्याने याबाबत रेल्वे प्रशासनाशी देखील पत्रव्यवहार केला असून, नागरिकांच्या याबाबत सूचना व हरकती मागविल्या आहेत.
मुंबई-पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारे अंतर कमी व्हावे. ही शहरे जलदगतीने जोडली जावीत, याकरिता द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली होती.
मात्र, खंडाळा बोरघाटातील खोपोली ते खंडाळा परिसरात द्रुतगती महामार्ग बनविताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या परिसरात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्ग एकत्र आले. त्यातच घाट क्षेत्रातील चढण व उतारामुळे या परिसरात अपघात व वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.
द्रुतगतीवर दुतर्फा असलेल्या मार्गिकांपैकी सर्वांत शेवटची लाईन ही अवजड वाहनांसाठी, मधली लेन ही हलक्या वाहनांसाठी व कॉरिडोरच्या लगतची लेन ही ओव्हर टेकिंगसाठी असा नियम असताना अमृतांजन पुलाखालील अरुंद जागेमुळे या ठिकाणी नियमाला छेद देत शेवटची लेन हलक्या वाहनांसाठी व मधली लेन अवजड वाहनांसाठी असे फलक लावलेले असल्याने या ठिकाणी लेन कटिंगची समस्या मोठी आहे. अमृतांजन पुलाच्या खाली रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना उतारावर वळण घेता येत असल्याने वाहने उलटून अनेक अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी सध्या रस्ते विकास महामंडळाने सदरचा पूल पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हा पुल पाडण्याऐवजी प्रशासनाने इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
>चुकीचा निर्णय : पर्यायी रस्ता बनविण्याची गरज
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटात होणारे अपघात व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खालापूर ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज दरम्यान नवीन पर्यायी रस्ता बनविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व संबंधित अधिकाऱ्यांनी या नवीन कामाची पाहणी करून निविदाप्रक्रियादेखील केली आहे. कुसगाव ते गारमाळ परिसरात रोडची मार्किंग झालेली असताना पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.