‘इंग्रजांच्या खबऱ्यांनी देशभक्ती शिकवू नये’
By Admin | Published: February 20, 2016 03:07 AM2016-02-20T03:07:01+5:302016-02-20T03:07:01+5:30
हौतात्म्याचा वारसा असणाऱ्या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खबऱ्यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.
मुंबई : हौतात्म्याचा वारसा असणाऱ्या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खबऱ्यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. ते गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशातील वर्तमान परिस्थितीवर चिंता व्यक्त करून खा. चव्हाण यांनी सद्य:स्थितीला केंद्रातील भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारणीभूत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणात विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावरून भाजपा व संघाने काँग्रेस व राहुल गांधींविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. केंद्र सरकार आणि संघ हेच केवळ देशप्रेमी आणि त्यांना विरोध करणारे इतर सर्व देशद्रोही, असे वातावरण देशात निर्माण केले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेकऱ्याची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यास समर्थन देणाऱ्यांना राष्ट्रभक्तीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवालही खा. चव्हाण यांनी केला.
राजकीय लाभासाठी भाजपा देशातील सामाजिक सौहार्दाला तडा देत आहे. देशभरातील काँग्रेस नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. साहित्यिक, कलावंत, पत्रकार, विद्यार्थी अशा प्रत्येक घटकावर विद्यमान सरकारची दडपशाही सुरू आहे. संघाची मानसिकताच हुकूमशाही समर्थक असल्यामुळे राजस्थानातील भाजपाचा आमदार राहुल गांधींना गोळ्या घालण्याची भाषा करतो. काँग्रेस पक्ष त्याचा वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवेल, असे खा. चव्हाण म्हणाले.