ब्रिटीशकालीन चांदीची नाणी सापडली
By admin | Published: May 7, 2014 01:42 AM2014-05-07T01:42:54+5:302014-05-07T01:42:54+5:30
तळई ता.एरंडोल: सर्व नाणी पोलिसाकडे जमा कासोदा, ता.एरंडोल : येथून जवळच असलेल्या तळई या गावी जुन्या घराचा पाया खोदताना ब्रिटीशकालीन चांदीची २१६ नाणी सापडल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे
ब्रिटीशकालीन चांदीची नाणी सापडली
तळई ता.एरंडोल: सर्व नाणी पोलिसाकडे जमा कासोदा, ता.एरंडोल : येथून जवळच असलेल्या तळई या गावी जुन्या घराचा पाया खोदताना ब्रिटीशकालीन चांदीची २१६ नाणी सापडल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. घरमालकाने आज स्वत:हून पोलीस स्टेशनला येऊन नाणी कासोदा पोलिसांच्या स्वाधीन केली. दि.२५ एप्रिल रोजी डिगंबर दामू पाटील (वय ५४) यांच्या मालकीच्या जुन्या घराच्या मागील भिंत पडल्याने तिचे नव्याने काम करून घेण्यासाठी पाया खोदकाम सुरू होते. सुमारे दीड ते दोन फूट पाया खोदला गेला असताना अचानक चांदीचे नाणे मिळून आले. यावेळी भैय्या वसंत तामस्वरे (वय-२८) व उमेश देवीदास महाजन हे दोन दोन मजून व स्वत: घरमालक उपस्थित होते. दि.६ रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान डिगंबर पाटील यांनी कासोदा पोलीस स्टेशनला येऊन ही नाणी पोलिसांच्या स्वाधीन केली. १८१८ ते १९१९ दरम्यानची ही एक रुपया किंमत लिहिलेली सुमारे अडीच किलो वजनाची २१६ नाणी एकाच ठिकाणी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. एक लाखाच्या वर आजच्या बाजारभावाने या नाण्यांची किंमत होत आहे. गेल्या २५ रोजी ही नाणी सापडली पण आज ती पोलिसात जमा केल्याने याबाबत चर्चा सुरू होती. परंतु डिगंबर पाटील यांनी आधी ही घटना गावातील पोलीस पाटलांना कळविली होती. नंतर जिल्हाधिकारी व तहसीलदार एरंडोल व जळगावी अनेकांना सांगून ही नाणी कोणाकडे जमा करू, असे विचारपूस ते करीत होते. परंतु कासोदा पोलिसांना या प्रकाराचा सुगावा लागल्याने त्यांनी त्यांना निरोप पाठवला व बोलावून घेतले, अशीही माहिती मिळाली आहे. पूर्ण चौकशीअंती संबंधित यंत्रणेकडे ही नाणी जमा केली जातील, अशी माहिती पी.एस.आय. आर.बी.राठोड यांनी दिली. (वार्ताहर)