ब्रिटिशकालीन फड बागायत आजही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 08:48 AM2017-03-16T08:48:50+5:302017-03-16T08:48:50+5:30
धुळ्यातील साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ब्रिटिशकालीन फड बागायत आजतागायतही सुरू आहे.
ऑनलाइन लोकमत/विशाल गांगुर्डे
धुळे, दि. 16 - साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ब्रिटिशकालीन फड बागायत आजतागायतही सुरू आहे. फड बागायत शेती कशी करावी? याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पूर्वीपासून स्थापन असलेले पंच मंडळ आजही कार्यान्वित आहे. या मंडळाचे नामकरण आता पाणी संस्था या नावाने करण्यात आले. विशेष म्हणजे या संस्थेतील पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसारच येथील शेतकरी त्यांच्या शेतात पिके घेत असल्याचे दिसून येते.
काय आहे फड बागायत?
पूर्वीच्या काळी पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य पाणीसाठा मिळावा, म्हणून पांझरा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याला फड बागायत असे नाव देण्यात आले. या बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्याद्वारे फड बागायत अस्तित्वात आली. त्या काळात येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून एक पाट काढण्यात आला. त्या पाटातून ‘उप पाट’ काढून येथील शेतकऱ्यांना नियोजनानुसार पाणी दिले जात होते.
शिस्तबद्ध पद्धतीने शेती
फड बागायत शेतीसाठी स्थापन पंच मंडळात एक अध्यक्ष व पाच ते सहा पंच असायचे. यात विशेष म्हणजे पांझरा नदीच्या डाव्या फड बागायतमध्ये वेगवेगळे चार फड होते. त्यात ‘तुुकड्या फड’ हा २८ एकरचा, ‘हजारो फड’ ४० एकर, ‘पलाणे फड’ हा ४० एकर, ‘डोक्यावर फड’ हा ४० एकरचा होता. यानुसारच शिस्तबद्ध पद्धतीने शेती केली जात होती. आजही या भागात या प्रकारातील शेती केली जाते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
फड बागायतीचे वैशिष्ट्य म्हणजे, फड बागायत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली जात असते. बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून नियोजनानुसार सर्व शेतकऱ्यांना पीक कोणते घ्यायचे? याबाबत पंच मंडळातील सदस्य मार्गदर्शन करत असतात. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच पिके घेतली जातात. रब्बी व खरीप हंगामाच्या वेळेस स्वतंत्र दोन बैठका घेतल्या जातात. त्यानंतर पीक लागवडीबाबत ठरत असते.
फड बागायतचा विस्तार झाला
सन १९७० ते १९७२ मध्ये पांझरा नदीवर लाटीपाडा धरण बांधण्यात आले. आज या धरणाला दोन गेट आहेत. उजवा व डावा कालव्याद्वारे स्थानिक फड बागायत आजही सुरू आहे. ही पद्धत तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी पण राबविण्यास सुरुवात केल्याने फड बागायतचा विस्तार झाला. परंतु, आजही पूर्वीप्रमाणे पंच मंडळ जेव्हा सांगेल, तेव्हा पाणी शेतकऱ्यांना मिळत असल्याचे चित्र आजही आहे.
पांझरा नदीच्या डाव्या फडावर चार उपफड आहेत. दोन फड मिळून एक पीक म्हणजे मका व उर्वरित दोन फड मिळून एक पीक जसे की, गहू असे पीक घेतले जाते. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळत असते. आजही डाव्या कालव्यावरील फड बागायती शिस्तप्रिय पद्धतीने नियोजन करून केली जाते, हे विशेष. तसेच उजव्या फडावरही याच पद्धतीने नियोजन करून अंदाजे १०० हेक्टरपर्यंत शेती केली जाते. यात देवीचा फड व पानथळ फड असे दोन फड आहे. पानथळ फडावर गेल्या काही काळात प्लॉट व तसेच लोकवस्ती वाढल्याने या भागातील फड बागायतीचे क्षेत्र कमी झाले आहे.