दलाल, क्लीअरिंग एजंटचे दुकान बंद
By Admin | Published: July 2, 2017 04:27 AM2017-07-02T04:27:45+5:302017-07-02T04:27:45+5:30
नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीवर बारीक नजर ठेवायची आणि जकात बुडव्यांना हटकायचे, हा महापालिका कर्मचाऱ्यांचा रोजचा दिनक्रम होता. मात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीवर बारीक नजर ठेवायची आणि जकात बुडव्यांना हटकायचे, हा महापालिका कर्मचाऱ्यांचा रोजचा दिनक्रम होता. मात्र, वस्तू व सेवा कर (जीएसटी) या नवीन कर पद्धतीने त्यांच्या हातचे काम हिरावून घेतले आहे. या १३०० कर्मचाऱ्यांना अन्य विभागांमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, तशा कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने, या कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे, तर जकात नाक्यांवरील दलालांचेही दुकान बंद झाले आहे.
देशातील श्रीमंत महापालिका हे बिरुद मिरविणाऱ्या मुंबई पालिकेची भिस्त जकात नाक्यांवर होती. दरवर्षी सरासरी सात हजार कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या जकात करामुळे, पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी उभा करून ठेवणे शक्य होत होते. हा कर पालिकेची तिजोरीच नव्हे, तर अनेकांचे खिसेही भरत होता. निम्मे उत्पन्न जकातमाफिया खिशात घालत असल्याचे बोलले जात असे. ते वगळून हजारो कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होत असल्याने, हा कर म्हणजे कर्मचारी आणि दलालांची चांदी करीत होता. मात्र, पालिकेच्या पाच जकात नाक्यांना टाळे लागले. या जकात नाक्यांवर या पूर्वी मालामाल होणारे अनके जण रस्त्यावर आले आहेत.
दलाल हवालदिल
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईत येणाऱ्या मालांवर जकात कर आकारला जात होता. पालिकेचे अधिकृत परवाने असलेले शेकडो जकात एजंट येथे कार्यरत असतात. या दलालांकडे हजारोंच्या संख्येने जकात क्लीअरिंगचे काम तरुण मुले करीत असतात. त्यांची दररोजची कमाई काही हजारो रुपयांमध्ये असते. मात्र, शुक्रवार मध्यरात्रीपासून जकात नाके बंद झाल्यामुळे, हे एजंट व त्यांच्याकडे काम करणारी ही मुले बेरोजगार झाली आहेत.
कमाईवर गदा
जकात नाक्याच्या कमाईवर काही कर्मचारी, दलाल व अधिकारी मालामाल झाले. जकात माफियांच्या दहशतीमुळे करोडो रुपयांचा महसूलही बुडत होता, तर काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही आपले उखळ पांढरे करून घेत होते. मात्र, जीएसटी लागू झाल्याने, या सर्वांच्या अतिरिक्त कमाईवर गदा आली असून, त्यांचे दुकान बंद झाले आहे.
विकासावर परिणाम होऊ देणार नाही
जकात कर रद्द झाल्याचा परिणाम पालिकेच्या विकासकामावर होऊ देणार नाही. जकात कराला पर्यायी स्रोत विकसित करण्यात येत आहे. मालमत्ता करांतून सहा हजार कोटी तर इमारत प्रस्ताव विभागातून पाच हजार कोटी रुपये मिळतील, अशी आशा आहे.
- अजय मेहता,
आयुक्त, मुंबई महापालिका
कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन
महापालिकेच्या जकात खात्यात एकूण १९०० पदे आहेत. १३०० पदे कार्यरत असून, ३०० ते ३५० कामगार वर्गातील पदे आहेत. त्यातील काहींना मालमत्ता विभागात सामावून घेतले जाणार आहे, तर काहींना अन्य विभागांच्या गरजेनुसार इतर ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न केला
जाईल, असे करनिर्धारण व संकलन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
जकातमधील काही कर्मचारी वर्ग हा निवडणूक विभागातही आहे. यापूर्वी जकात रद्द करून, एलबीटी आणि त्यानंतर जीएसटी लागू होणार असल्यामुळे, गेल्या पाच वर्षांमध्ये या विभागात कर्मचाऱ्यांची भरतीच करण्यात आली नव्हती. त्यामुळे या विभागात सुमारे ६०० पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. लेखापरीक्षण विभागातही ३०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे ९०० कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन होऊ शकते. उर्वरित चारशे कर्मचाऱ्यांबाबत विचार सुरू आहे.
जकात नाक्यांवर संभ्रम व गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेली कित्येक दशके पालिकेला मालामाल करणाऱ्या जकात कराने जाता-जाताही पालिकेची झोळी भरली. त्यामुळे पालिकाच नव्हे, तर जकात नाक्यांवरील कर्मचारी, दलाल, माफियांना मालामाल करणाऱ्या जकात कराला या मंडळींनी जड अंत:करणाने निरोप दिला. मात्र, नवीन लागू होणाऱ्या करप्रणालीचे काय करावे? त्यात आपली भूमिका काय? याबाबत कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अंधारात आहेत. त्यामुळे जकात नाक्यांवर मात्र, संभ्रमाचे वातावरण होते. पालिकेतही सावळागोंधळ होता.
खासगी बस टर्मिनस
जकात कर रद्द होत असल्यामुळे जकात नाक्यांची जागा खासगी बससाठी उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई बस मालक संघटनेने केली आहे. याबाबत खुद्द वाहतूक पोलिसांनी पालिकेला पत्र लिहून आपले मत मागविले आहे. मात्र, या जकात नाक्यांच्या जागांचे काय करायचे? याबाबत पालिकेने धोरण निश्चित केलेले नाही.
संरक्षक भिंती
जकात नाके बंद करण्यात आल्यानंतर, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी सर्व नाक्यांच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे तेथे कोणतेही अतिक्रमण होणार नाही, परंतु याबरोबरच जुने काही रेकॉर्ड असल्यामुळे आपला कर्मचारी वर्गही तेथे तैनात करण्यात येणार आहे.
मुलुंड जकात नाक्यावर शुकशुकाट : वस्तू सेवा कर देशभरात लागू झाल्यामुळे शहरातील मुलुंड जकात नाक्यावर शुकशुकाट पसरला आहे. रोज सुमारे दोन हजार वाहनांची वर्दळ असलेल्या जकात नाक्यावरील सर्व व्यवहार थंड पडल्याचे दिसून आले. जकात नाक्यावरील अधिकारी-कर्मचारी यांची शनिवारच्या कार्यालयाची सुरुवात बैठकीने सुरू झाल्याचे चित्र होते. पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड येथील जकात नाक्यावर दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असे. मात्र, शनिवारी सकाळी ही सगळी उलाढाल ठप्प झाली होती.