मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळाली, मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:01 IST2025-02-09T10:57:31+5:302025-02-09T11:01:27+5:30
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळाली, मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संतापले
Manoj Jarange Patil ( Marathi News ) : जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली आहे. काल जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली, यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील ५ जणांचा समावेश आहेत. या कारवाईवरुन आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
ना जागा जिंकल्या, ना मतं मिळाली, तरीही दिल्लीच्या निकालाने काँग्रेस खूश, ही आहेत पाच कारणं
प्रशासनाने जालना जिल्ह्यात केलेल्या तडीपारीच्या कारवाईवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. जरांगे पाटील म्हणाले, फडणवीस सांगतात केसेस मागे घेऊ आणि दुसरीकडे नोटीसा पाठवत आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणं घेणं नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवलीतील आंदोलकांना जर नोटीस पाठवणार असणार, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
नोटीसा मागे घ्याव्यात
"तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. आमची अशी इच्छा होती की, मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीस यांनी करावं, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती. बेमानी आणि गद्दारी हा शब्दाचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका, आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सर्व हाताने मदत केली. तू रंडकुंडीला आला होता, ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुमचं भागलं म्हणून उलटणार असाल तर हे तुमच्यासाठी घातक असणार आहे, त्यांनी चूक सुधारावी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असंही जरांगे म्हणाले. मेहुण्यावरील कारवाईवर बोलताना जरांगे म्हणाले, आपण स्पष्ट सांगितलयं तुमचं बाकीचं काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.