प्रॉपर्टीच्या वादातून भावाची हत्या
By admin | Published: June 26, 2017 02:35 AM2017-06-26T02:35:25+5:302017-06-26T02:35:25+5:30
घर आणि जमिनीच्या वादातून थोरल्या भावाने धाकट्या भावावर चाकूने तब्बल ते पंधरा ते वीस वार करून त्याची हत्या करण्याची घटना येथील एलआयजी कॉलनीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली (रायगड) : घर आणि जमिनीच्या वादातून थोरल्या भावाने धाकट्या भावावर चाकूने तब्बल ते पंधरा ते वीस वार करून त्याची हत्या करण्याची घटना येथील एलआयजी कॉलनीत घडली.
राजेश बाबल्या जाधव (३५) असे मृत तरूणाचे नाव असून तो आपली आई व भाऊ मंगेशसह (४२) कळंबोली वसाहतीत राहत होता. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत. जाधव कुटुंबिय मूळ इचवली, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथील आहेत. त्यांची गावाला सात एकर जमीन तसेच कळंबोली एलआयजी कॉलनीत घर आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघा भावांमध्ये या मालत्तेच्या वाटणीवरून धुसफुस होती. लहान भावाचा काटा काढला तर वाटेकरी उरणार नाही, असा विचार करून मंगेश याने रविवारी सकाळी अकरा वाजता राजेशवर चाकूने तब्बल पंधरा ते सोळा वार केले. प्रचंड रक्तस्त्रात झाल्याने राजेशचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. हा खून जमीन आणि घराच्या वादातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी दिली.