भाऊचा धक्का-मोराला ‘स्पीड’
By admin | Published: January 5, 2015 05:00 AM2015-01-05T05:00:17+5:302015-01-05T05:00:17+5:30
प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा असणा-या या स्पीड बोटी ४० मिनिटांत प्रवाशांना मुंबईत पोहोचविणार आहेत. त्यामुळे रखडत चालणाऱ्या जुनाट वेळखाऊ बोटींच्या सेवेतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
मधुकर ठाकूर, उरण
भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील प्रवासाचा वेळ आता २० मिनिटांनी घटणार आहे. खासगी कंपनीच्या वेगवान बोटींना प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिल्याने येत्या फेब्रुवारीपासून या जलमार्गावर फायबरच्या स्पीड बोटी धावणार आहेत. प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा असणा-या या स्पीड बोटी ४० मिनिटांत प्रवाशांना मुंबईत पोहोचविणार आहेत. त्यामुळे रखडत चालणाऱ्या जुनाट वेळखाऊ बोटींच्या सेवेतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
भाऊचा धक्का-मोरा या सागरी मार्गावरून दररोज हजारो प्रवासी आणि कामगार प्रवास करतात. या सागरी मार्गावर ५० वर्षांपासून चालत असलेल्या जुनाट प्रवासी बोटी ९ कि.मी. सागरी अंतर कापण्यासाठी तासाभराचा अवधी घेतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांना अनियमित सेवेचा सामना करावा लागतोच, शिवाय कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. मोरा सागरी मार्गावरून पावसाच्या आणि मालक -कर्मचाऱ्यांच्या लहरीनुसारच प्रवासी बोटी सोडल्या जातात. पावसाळी हंगामात मोरा जलमार्गावरील तिकीट दरात १० ते १५ रुपयांपर्यंत वाढ केली जाते. ही तिकीट दरवाढ कित्येक वेळा इंधन महागल्याचे कारण पुढे करीत नंतर कायम केली जाते. त्यामुळे कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नसतानाही प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
या समस्यांमुळे मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांनी सागरी मार्गाचा नाद सोडून बेलापूर-जुईनगर गाठून रेल्वेप्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळे रेवस, मोरा या सागरी मार्गावरील प्रवाशांची संख्या घटली आहे.
या सागरी मार्गावर मागील ५० वर्षांपासून खासगी लाँच मालकांचीच मक्तेदारी आहे. लाँचमालकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मोरा सागरी मार्गावर स्पीड बोटी चालविण्यासाठी ‘आर.एम. शिपिंग कंपनी’ने परवानगी मागितली होती. प्रशासनानेही प्रवाशांचे हित जपण्यासाठी भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावर स्पीड बोटींना सहा महिन्यांपूर्वीच बंदर विभागाकडून परवानगी दिली आहे.