कांद्यावर आणली साठामर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:13 AM2019-12-16T05:13:29+5:302019-12-16T05:13:40+5:30
अवकाळी पावसाने कांदा उत्पादक राज्यांमध्ये नुकसान
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक राज्यांमधे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने देशातील कांद्याचे भाव गगनाला गेले आहेत. त्यासाठी यंदा तब्बल एक लाख टन कांदा आयात करण्याची केंद्र सरकारने नियोजन केले आहे. तसेच, देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना साठा करण्यावरही निर्बंध घातले आहेत.
खरिपामधे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी देशभरातील कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली. कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव शंभर रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतवारीनुसार कांद्याचा भाव २० ते नव्वद रुपये आहे. देशातील कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने १.२ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १२ हजार ६६० टन कांदा येत्या २७ डिसेंबरपर्यंत देशात पोहोचेल. तसेच, ३० हजार टन कांदा आयातीचे करारदेखील झाले असल्याचे केंद्रीय ग्राहक आणि अन्नधान्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.
कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना असलेली साठामर्यादा देखील कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. किरकोळ व्यापाºयांना पूर्वी असलेला ५ टनाचा कोटा दोनपर्यंत खाली आणण्यात आला आहे. तर, घाऊक व्यापाºयांना असलेला ५० टनांचा कोटा २५ टनांवर आणण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारला या कोट्याचे पालन केले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.