बीआरटी अपघात; नगरसेवक आक्रमक

By admin | Published: May 19, 2016 01:27 AM2016-05-19T01:27:58+5:302016-05-19T01:27:58+5:30

बीआरटी मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली.

BRT accidents; Corporator aggressor | बीआरटी अपघात; नगरसेवक आक्रमक

बीआरटी अपघात; नगरसेवक आक्रमक

Next


पुणे : नगर रस्ता बीआरटी मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली. या अपघातप्रकरणी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन फलक फडकाविल्याने सभेचे कामकाज बंद पाडले. अखेर महापौर प्रशांत जगताप यांनी सभा तहकूब केली.
नगर रस्ता बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून त्यावर सतत अपघात होत आहेत. महापौर जगताप, पर्यायाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईत हा मार्ग सुरू केला, असा आरोप केला जात आहे. सभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी बीआरटी मार्गाच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक सभेत फडकावले. पीएमपीएमएल अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. संस्थेचे काही काम असले, विशेषत: महापालिकेकडून पैसे घ्यायचे असतील तर पीएमपीएमएलचे व्यवस्थापक अभिषेक कृष्णा सभेला उपस्थित राहतात, आता ते कुठे आहेत, अशी विचारणा शिंदे यांनी केली. शिंदे यांच्या या आक्रमक सवालामुळे भाजपा तसेच सेनेचे सदस्यही जोरजोरात घोषणा देऊ लागले. सेनेच्या संजय भोसले, पृथ्वीराज सुतार यांनी नागरिकांना मारण्यासाठी म्हणून बीआरटी मार्ग सुरू केला आहे का? असा प्रश्न महापौरांना केला. सर्व अपघातांना पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. असा मार्ग सुरू करण्यापूर्वी त्यात येणाऱ्या सर्व अडथळ्यांची माहिती घेणे गरजेचे असते. तसे काहीही न करता केवळ नेत्यांची तारीख मिळाली, म्हणून घाईने उद््घाटन केल्याची टीका भाजपाचे गणेश बीडकर, धनंजय जाधव यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: BRT accidents; Corporator aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.