बीएसएनएलच्या महाव्यवस्थापकाला अटक
By admin | Published: March 26, 2016 01:29 AM2016-03-26T01:29:21+5:302016-03-26T01:29:21+5:30
ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) रत्नागिरी विभागीय महाव्यवस्थापक सुहास कांबळे यांच्यासह चालक तन्वीर
रत्नागिरी : ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) रत्नागिरी विभागीय महाव्यवस्थापक सुहास कांबळे यांच्यासह चालक तन्वीर बागवान यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गेल्या दोन दिवसांच्या चौकशीनंतर शुक्रवारी ही कारवाई केली.
एका ठेकेदाराचे ७० लाख रुपयांचे बिल गेल्या काही दिवसांपासून मंजूर झाले नव्हते. ही बिलाची रक्कम मिळावी यासाठी सुहास कांबळे यांनी ३ टक्के अर्थात २ लाख रुपये लाच मागितल्याची तक्रार संबंधित ठेकेदाराने मुंबईतील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ३ टक्के रक्कम लाच म्हणून देण्याची तयारी या ठेकेदाराने दाखवली. कांबळे यांचा गाडीचालक तन्वीर बागवान याच्या मदतीने कांबळे यांच्याशी संबंधित दोन व्यक्तींच्या बँक खात्यात ही दोन लाखांची रक्कम जमा करण्यात आली. याची माहिती ठेकेदाराने सीबीआयला दिली.
त्यानुसार सीबीआयच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत कारवाईला सुरुवात केली. कांबळे यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. त्यात रक्कम जमा केलेल्या दोन्ही बॅँक खातेपुस्तकांची खातरजमा करण्यात आली. प्राथमिक तपासात कांबळे हे संशयित आरोपी म्हणून समोर आल्याने त्यांना व चालक बागवान यांना अटक करण्यात आली, अशी माहिती तपास करणाऱ्या मुंबईतील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
२९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
लाचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुहास कांबळे व तन्वीर बागवान या दोघांनाही शुक्रवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.