बीएसएनएल ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 02:51 AM2017-02-28T02:51:31+5:302017-02-28T02:51:31+5:30

भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले

BSNL proved to be a great service to the customers | बीएसएनएल ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सिद्ध

बीएसएनएल ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सिद्ध

Next


अलिबाग : देशातील खेड्यापाड्यात आणि दरीडोंगरात, केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर जनसामान्य ग्राहकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. असे असले तरी बीएसएनएल कर्मचारी व अधिकारी उपलब्ध साधनसामग्रीतून आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकरिता सिद्ध असल्याचे प्रतिपादन बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा सचिव पुरुषोत्तम गेडाम यांनी केले आहे.
बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन रायगडच्या पाचव्या अधिवेशनाचे आयोजन शनिवारी येथील बीएसएनएल टेक्निकल बिल्डिंगमधील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ‘ग्राहकांचा बीएसएनएलवरील विश्वास आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादात गेडाम बोलत होते. गेडाम म्हणाले की, हातपाय बांधून ठेवायचे आणि कुस्ती खेळायला सांगायचे, अशी अवस्था सरकारने बीएसएनएलची केली आहे. बीएसएनएसच्या उपलब्ध मूळ पायाभूत व्यवस्थेच्या आधाराने खासगी मोबाइल कंपन्या केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून बीएसएनएलबरोबर स्पर्धा करीत आहेत. या खासगी कंपन्या हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजारात उतरल्या आहेत. त्याच वेळी बीएसएनएलकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद करण्यात येत नाही, यातूनच सरकार कोणासाठी काम करते आहे हे दिसून येत आहे. बीएसएनएल मोबाइल टॉवर्स खासगी कंपन्यांना देण्याचा सरकारचा जो प्रस्ताव आहे त्यास आमचा सक्त विरोध राहाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.
बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव म्हणाले की, रायगड जिल्ह्यात होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या विशेषत: महामार्गांच्या कामांमुळे बीएसएनएलची ओएफसी केबल तुटण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यातील समस्यांचे स्वरूप राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे असल्याने, येथील समस्या दूरकरण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. परंतु ग्राहकांना उत्तम विनाखंड सेवा देण्याकरिता अखेर आपल्यालाच काम करावे लागणार आहे. अशाही परिस्थितीत बीएसएनएल जिल्ह्यातील बँका, ग्रामीण क्षेत्र, रुग्णालये, ग्रामपंचायती यांना चांगली सेवा देण्यात यशस्वी होत असल्याचे त्यांनी अखेरीस नमूद केले. बीएसएनएल कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले विचार मांडले.
यावेळी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल जोग, बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव, बीएसएनएल कामगार संघटनेचे वरिष्ठ अधिकारी भालचंद्र माने, दीपक जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: BSNL proved to be a great service to the customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.