बीएसयूपीप्रकरणी घरत, उगले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 03:27 AM2016-08-23T03:27:23+5:302016-08-23T03:27:23+5:30

पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला नसताना बांधकाम केल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त संजय घरत व माजी शहरअभियंता पी. के. उगले अडचणीत आले

In the BSUP investigation | बीएसयूपीप्रकरणी घरत, उगले अडचणीत

बीएसयूपीप्रकरणी घरत, उगले अडचणीत

Next


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका बांधत असलेल्या बीएसयूपी-घरकुल प्रकल्प योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला नसताना बांधकाम केल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त संजय घरत व माजी शहरअभियंता पी. के. उगले अडचणीत आले आहेत. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची सुनावणी ६ आॅक्टोबरला होणार आहे.
केंद्र सरकारच्या बीएसयूपी प्रकल्पांतर्गत शहरातील गरिबांसाठी घरकुले बांधण्याचे काम केडीएमसी हद्दीत सुरू आहे. या प्रकल्पाला डिसेंबर २००६ ला मंजुरी मिळाली. २००७ ला कामांच्या निविदा काढण्यात आल्या. जून २००८ मध्ये कामाचे कार्यादेश देण्यात आले. दरम्यान, २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम करायचे असल्याने पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला आवश्यक होता. त्यामुळे कचोरे आणि खंबाळपाडा परिसरांतील प्रकल्पाच्या कामासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक होती. परंतु, तेव्हा ती महापालिकेला मिळाली नव्हती.
पर्यावरण विभागाच्या ना-हरकत दाखल्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरीय समित्यांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यात पाठपुरावा कमी पडल्याने हा दाखला मिळू शकला नाही. अखेर, काम सुरू झाल्यापासून १८ महिन्यांत ते पूर्ण करणे अपेक्षित असल्याने प्रशासनाने यासंदर्भातील नियमांची पूर्तता न करता कचोरे आणि खंबाळपाडा प्रकल्पांतील इमारतींचे बांधकाम ना-हरकत दाखला न घेता केले. दरम्यान, याची गंभीर दखल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त सचिवांनी घेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाला केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, प्रदूषण संरक्षण कायद्याचे कलम १५ आणि १६ चा भंग केल्याचा ठपका ठेवत बीएसयूपी प्रकल्पाचे प्रमुख घरत आणि तत्कालीन शहरअभियंता उगले यांच्याविरोधात कल्याण जिल्हा न्यायालयातील तिसऱ्या न्यायालयात हे फौजदारी गुन्हे दाखल केले. याप्रकरणी समन्स बजावल्याने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दोघांनाही न्यायालयात उपस्थित राहावे लागले होते.
शहर अभियंता उगले हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्याविरोधात अनियमितताप्रकरणी याआधीच लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल झाला आहे. यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. तर, घरत यांना बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांची यादी बनवण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्रन यांनी याआधी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)
>घरतांकडून प्रतिसाद नाही
यासंदर्भात ‘लोकमत’ने घरत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर, उगले यांनी आपण या प्रकल्पाचे प्रमुख नाही. त्यामुळे आपला याच्याशी काहीही संबंध नाही. माझ्यावर दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे. पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात आपली बाजू मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: In the BSUP investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.