फुग्याच्या गॅस सिलिंडरचा स्फोट
By Admin | Published: December 25, 2015 04:32 AM2015-12-25T04:32:09+5:302015-12-25T04:32:09+5:30
कल्याण पूर्वेतील नांदिवली गावात असलेल्या आर्य गुरुकुल शाळेत गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.
कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली गावात असलेल्या आर्य गुरुकुल शाळेत गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यात फुगेविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आणि पाच विद्यार्थी, सात पालक असे १२ जण जखमी झाले. शाळेतील आनंद मेळ्यावेळी ही घटना घडली.
जखमींतील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले असून उरलेल्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून गॅस सिलिंडरच्या दर्जासह फुगेविक्रेत्याला तेथे उभे राहण्यास कोणी परवानगी दिली, त्याची चौकशी सुरू केली आहे.
रामदरस प्रसाद (५०, रा. कल्याण पूर्व) असे फुगेविक्रेत्याचे नाव आहे आणि तो नेहमीच शाळेच्या परिसरात असतो, अशी माहिती मिळाली आहे. क्र ीडांगणाबाहेर फुग्यांमध्ये गॅस भरणारा सिलिंडर आणि रंगीबेरंगी फुगे घेऊन रामदरस उभा होता. शाळेतील लहान मुलांनी पालकांकडे हट्ट करत या फुग्यांसाठी तेथे गर्दी सुरू केली. त्याच वेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, फुगेवाला काही फूट उंच उडाला आणि शाळेच्या पत्र्यांना आपटून खाली कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळी फुगेवाल्याच्या भोवती असलेली, तेथून जाणारी मुले, पालक या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. गॅसमुळे त्यांचे डोळे, चेहरा, हाताला जखमा झाल्या. ते भाजले. जखमी झालेली सर्व मुले ज्युनिअर आणि सीनिअर केजीतील आहेत. जखमींतील काहींना डोंबिवलीच्या एम्स रु ग्णालयात, तर काही मुले व पालकांना कल्याणच्या मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.