लठ्ठपणाविषयीच्या जाहिरातींचा ‘फुगा’
By admin | Published: January 22, 2015 12:39 AM2015-01-22T00:39:24+5:302015-01-22T00:39:24+5:30
वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा मारा आदी विविध कारणांमुळे व बदलत्या जीवनशैलीत कष्टाची कामे घटल्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे.
मिलिंद कांबळे - पिंपरी
वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा मारा आदी विविध कारणांमुळे व बदलत्या जीवनशैलीत कष्टाची कामे घटल्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. यावर उपाय म्हणून औषधोपचार व विविध तंत्रांचा वापर केला जातो. यासाठी आकर्षक जाहिरातबाजी करीत नागरिकांना भुलविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या औषधोपचारांचा लाभ होण्यापेक्षा मनस्ताप व फसवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.
शहरात वजन वाढलेल्या नागरिकांची संख्या फुगतच चालली आहे. यात लहान मुलांचीही संख्या दिसून येते. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. लठ्ठपणा घटविण्यासाठी विविध संस्थांतर्फे आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. त्याची आकर्षक जाहिरात केली जाते. या जाहिरातीच्या माहितीला भुलून अनेक जण मोठी रक्कम भरून या योजनेचा लाभ घेतात. काही महिने उलटल्यानंतर प्रत्यक्षात त्याचा कोणताच लाभ होत नसल्याचे दिसून येते. उलट, इतर आजार झाल्याने त्रास सहन करावा लागतो. यातून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. यामुळे वैतागलेले नागरिक वजन घटविण्यापेक्षा आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करतात. ऐकीव व इतर माहितीच्या आधारे व्यायाम आणि औषधांचे सेवन सुरू करतात. अपेक्षित लाभ मिळत नसल्याने अखेरीस वजन कमी करण्याचा उत्साह मावळतो.
वजन घटविण्याच्या नाना तऱ्हा
‘ग्रीन टी’ घेणे. विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या औषधांचे सेवन करणे. पोट, कंबर आणि मांड्यांना निरनिराळ्या पद्धतीचे पट्टे लावणे. व्यायाम आणि योगासने करणे, धावणे, पोहणे, चालणे आणि सायकलिंग करणे. आहार कमी करुन पथ्य पाळणे, आदी निरनिराळे उपाय सांगितले जातात. प्रत्येक संस्था आणि केंद्राच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. विशिष्ट कालावधीत अमुक किलो वजन कमी करण्याचा दावा केला जातो.
सप्लिमेंट फूडचा मारा
सप्लिमेंट फूड देऊन वजन घटविणे, तसेच वजन वाढविण्याची एक पद्धत आहे. हे सप्लिमेंटचे सेवन केल्याने वजन कमी होत असल्याचा दावा केला जातो. या सप्लिमेंटचे डब्बे हजारोच्या किमतीत आहेत. काहींना या सप्लिमेंटच्या दुष्परिणामास सामोरे जावे लागते.
तंत्रांसाठी हजारोंचे शुल्क
अद्ययावत दालन उघडून विशिष्ट औषधे घेणे, मसाज करणे, व्यायाम करणे, पोटास पट्टा लावणे आदी पद्धतीचा अवलंब केला जातो. यासाठी हजार ते लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. यासाठी मर्यादित कालावधी ठरविला जातो. मसाज आणि इतर गोष्टींसाठी स्वतंत्र मार्गदर्शकही असतो. नियमित आहारावर निर्बंध घातले जातात. सांगितल्याप्रमाणे आहार घेणे सक्तीचे केले जाते.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घ्यावीत
ठराविक औषधे डॉक्टरांना विचारून आणि वयानुसार घ्यावीत. नियमितपणे व्यायाम, आहार आणि आवश्यक योग्य औषधामुळे वजन घटविण्यास मदत होते. व्यायामामुळे सडपातळ, उत्साही आणि प्रसन्न राहण्यास मदत होते.
- डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी