बुद्धधम्म थायलंड-भारतातील दुवा
By admin | Published: October 5, 2014 01:02 AM2014-10-05T01:02:58+5:302014-10-05T01:02:58+5:30
थायलंड आणि भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. या दोन्ही राष्ट्राला जोडण्याचे काम बुद्ध धम्माने केले आहे. त्यामुळे बुद्ध धम्म हा या दोन्ही राष्ट्रांमधील दुवा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील मेजर जनरल
धम्मचक्र प्रवर्तनदिन : मेजर जनरल थनसक पूमपेच यांचे प्रतिपादन
नागपूर : थायलंड आणि भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. या दोन्ही राष्ट्राला जोडण्याचे काम बुद्ध धम्माने केले आहे. त्यामुळे बुद्ध धम्म हा या दोन्ही राष्ट्रांमधील दुवा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील मेजर जनरल थनसक पूमपेच यांनी शुक्रवारी दीक्षाभूमी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडमधील ज्येष्ठ पत्रकार डॉ. रंगथीप छोटनापलाई, महापौर प्रवीण दटके, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, भदंत विमलकीर्ती गुणसिरी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती हर्षदीप कांबळे, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, अॅड आनंद फुलझेले, विजय चिकाटे , प्राचार्य डॉ. प्रकाश खरात, मालती रेड्डी आदी उपस्थित होते. मेजर जनरल पूमपेच पुढे म्हणाले, थायलंड हे एक बुद्धिस्ट राष्ट्र आहे. त्यामुळे तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्या भारतात झाला त्या राष्ट्राबद्दल आम्हाला अतिव आदर आहे.भारतासोबत थायलंडचे संबंध प्राचीन काळापासूनचे मैत्रीचे राहिले असून यापुढेही मैत्रीचेच संबंध राहतील, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.
डॉ. रंगथीप छोटनापलाई म्हणाल्या, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला केवळ धम्मच दिला नाही, तर जीवन जगण्याचा एक मंत्र दिला आहे..
महापौर प्रवीण दटके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अथक परिश्रमातून दीक्षाभूमी उभी झाली आहे. यापुढेसुद्धा महापालिका स्मारक समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. संचालन व अनुवाद डॉ. एस. के. गजभिये यांनी केले. (प्रतिनिधी)