Budget 2020: केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’!: अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 09:32 PM2020-02-01T21:32:45+5:302020-02-01T21:33:23+5:30
केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातील ‘थालीनॉमिक्स’ या शब्दाचा धागा धरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’ असल्याची टीका केली आहे.
मुंबई- केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातील ‘थालीनॉमिक्स’ या शब्दाचा धागा धरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’ असल्याची टीका केली आहे. केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेच्या दशा आणि दिशेचे भान नाही, हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. अर्थव्यवस्थेला केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या मोठ्या भाषणाची नव्हे तर मोठ्या उपाययोजनांची आवश्यकता होती. अर्थव्यवस्था, विकासदर गटांगळ्या खात असताना अर्थमंत्र्यांनी केवळ शब्दांचा अन् आकड्यांचा खेळ केला, असा आरोप चव्हाण यांनी केला.
सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. पण त्यासाठी कृषिक्षेत्राचा विकासदर साधारणतः ११ टक्के असायला हवा. तो केवळ २ टक्के आहे. शेतीसाठी १६ सूत्री कार्यक्रम जाहीर केला. पण कृषी क्षेत्रातील तरतुदीत विशेष वाढ केली नाही. २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे दावे केले जात आहेत. पण त्यासाठी विकासदर ९ टक्के असायला हवा. गेल्या तिमाहीत आपण त्याच्या निम्मा म्हणजे ४.५ टक्केही विकास दर गाठू शकलो नव्हतो, या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प ‘जुमलेनॉमिक्स’ नव्हे तर आणखी काय आहे? असाही प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.
या अर्थसंकल्पात बेरोजगारीसारख्या ज्वलंत समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. उत्पादकतेला चालना देण्यात आली नाही. गरीब, मध्यमवर्गीय, नोकरदार यांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढविण्याचा प्रयत्न झाला नाही.महाराष्ट्रासोबत तर मोठा विश्वासघातच झाला आहे. मुंबईतील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातला नेण्याची अधिकृत घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे. मुंबईचे महत्व कमी करण्याचा हा घाट असून, त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.