Budget 2021: "नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब"; फडणवीसांकडून नागपूर, नाशिककरांचं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:03 PM2021-02-01T14:03:33+5:302021-02-01T14:13:14+5:30
Budget 2021, Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूर आणि नाशिककरांचं अभिनंदन
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, केंद्र सरकारची राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० पूर्णपणे तयार असल्याची घोषणा करत यासाठी एकूण १.१० लाख कोटींचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच, रेल्वेशिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर फोकस करण्यात आला आहे. त्यासाठी १८ हजार कोटींची गुंतवणूक मेट्रो आणि इतर परिवहन सेवेवर खर्च करण्यात येणार आहेत. मेट्रोचे जाळं देशातील शहरांमध्ये पसरवण्यावर जोर दिला जाईल. यात कोच्ची, बंगळुरू, चेन्नई यांच्यासह महाराष्ट्रातल्या नागपूर, नाशिक शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. (Budget 2021 Latest News and updates)
अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तसेच, केंद्र सरकारने नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारले जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत देण्यात आल्याची माहित देत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
In today’s #AatmanirbharBharatKaBudget GoI made a provision of ₹2092 crore for Nashik Metro.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2021
Thank you Hon PM @narendramodi ji , Hon FM @nsitharaman ji !
Nagpur Metro Phase-2 too got ₹5976 crore. Both these proposals were sent during our tenure of Maharashtra Government.
दरम्यान, भारतीय रेल्वेसोबत सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यासाठी रेल्वेशिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर फोकस करण्यात आला आहे. याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे. तामिळनाडू नॅशनल हायवेसाठी १.०३ लाख कोटींची घोषणा केली आहे, यात इकॉनोमिक कॉरिडोर बनवला जाईल, केरळमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग उभारले जातील, मुंबई-कन्याकुमारी इकॉनोमिक कॉरिडोरची घोषणाही यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्येही कोलकाता-सिलीगुडी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचसह आसाममध्ये पुढील ३ वर्षात हायवे आणि इकॉनोमिक कॉरिडोर बनवण्यात येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे