Budget 2022: मराठवाड्यातील छोट्या शेतातून घेतली भरारी; देशाचं बजेट सादर करण्याची मोठी जबाबदारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:38 AM2022-02-01T09:38:19+5:302022-02-01T09:57:06+5:30
Dr. Bhagwat Karad will Present Budget 2022: स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने स्थान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) सादर करणाऱ्या प्रमुख टीममध्ये असणार आहेत.
सुपर स्पेशालिस्ट बालरोग शल्यचिकित्सक ते लोकसेवक असा प्रवास केलेला मराठवाड्याचा सुपुत्र आज देशाचे बजेट सादर करणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अर्थसंकल्प मांडतील. मराठवाड्यातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, यामुळे या प्रकल्पांसह नवीन काय मिळेल यावर नागरिकांचे लक्ष आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने स्थान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) सादर करणाऱ्या प्रमुख टीममध्ये असणार आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्रीय बजेट प्रक्रियेत असण्याची संधी डॉ. कराड यांच्यामुळे मिळाल्याने ही औरंगाबादसाठी भूषणावह अशी बाब आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि डॉ. कराड बजेट सादर करतील. आपल्या आयुष्यातील ही मोठी संधी असून, विलक्षण आणि अविस्मरणीय असा हा क्षण असल्याचे डॉ. कराड यांनी बजेटच्या पूर्वसंध्येला लोकमतशी बोलताना सांगितले.
भागवत कराड यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण असताना सुरुवातीला ते आणि त्यांचे आई वडील कच्च्या घरात राहत होते. खडतर परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी डॉक्टर होण्यासाठी औरंगाबादचा रस्ता धरला आणि मराठवाड्याचे पहिले वहिले लहान मुलांवर उपचार करणारे सर्जन बनले. असे करताना त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या भावंडांनाही शिकविले आणि दुसरीकडे वैद्यकीय सेवा आणि लोकसेवाही सुरु ठेवली.
''जेव्हा तुम्ही यशाच्या किंवा एखाद्या शिखराच्या उत्तुंग शिखरावर असता तेव्हा तेथून पायऊतार व्हा, दुसरे शिखर गाठण्याचा प्रयत्न करा'', असे ते आपल्या मुलांना नेहमी सांगतात. पुढे जाऊन भागवत कराड हे औरंगाबादचे आधी उपमहापौर नंतर महापौर झाले. यानंतर राज्यसभेतून आता थेट केंद्रीय राज्य मंत्रीपद सांभाळत आहेत.
भागवत कराडांच्या या प्रवासाविषयी त्यांचा मुलगा वरुण कराड यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. मराठवाड्याच्या छोट्याशा शेतातून निघालेला मुलगा आज देशाचे बजेट मांडणार आहे, असे ते म्हणाले.