६८ कोटींचे अंदाजपत्रक
By admin | Published: February 28, 2017 01:39 AM2017-02-28T01:39:48+5:302017-02-28T01:39:48+5:30
दौंड नगर परिषदेने २०१७-१८ या वर्षाचा ४२ लाख रुपये शिल्लक ठेवूून ६८ कोटी ३५ लाख ९८ हजारांचा अर्थसंकल्प जाहीर केला.
दौंड : दौंड नगर परिषदेने २०१७-१८ या वर्षाचा ४२ लाख रुपये शिल्लक ठेवूून ६८ कोटी ३५ लाख ९८ हजारांचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात पाणीपट्टी विकास शुल्कवाढ करण्यात आली असून, बाकी सुविधांमध्ये किरकोळ वाढ करण्यात आली आहे. नगर परिषद सभागृहात अर्थसंकल्पीय बैठक नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी बोलावली होती. या वेळी उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
पाणीपट्टी १६०० रुपये होती, त्यात २०० रुपयांनी वाढ करून ती १८०० रुपये करण्यात आली आहे, तर विकास शुल्क ५० ऐवजी १०० रुपये करण्यात आले असून, बाकी सुविधांमध्ये किरकोळ स्वरूपात वाढ करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख म्हणाले, की पाणीपट्टीत वाढ करू नका, रोज पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाणीपट्टीत वाढ केल्यास काही हरकत नाही. मात्र, तो खर्च कमी करून कमी खर्चात पाणी स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
महिन्याला साडेतीन लाख रुपये पाणी स्वच्छतेवर खर्च होतो. तरीदेखील काही प्रभागात गढूळ पाणी येते. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी म्हणाल्या, की पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. हरकत राहणार नाही. परंतु, सध्या मुबलक प्रमाणात पाणी आहे. नगरसेविका प्रणोती चलवादी म्हणाल्या, की नेहरूनगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. कारण, या भागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच, नगर परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी योग्य ती उपाययोजना झाली पाहिजे.
नगरसेवक इंद्रजित जगदाळे म्हणाले, की शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आपण ठेकेदाराला काम देतो, आपले आरोग्य खात्याचे कर्मचारी काय करतात, यावर नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड म्हणाले, की सफाई कामगार साफ करून निघून जातात.
>आता लोकशाहीचे पर्व सुरू...
दौंड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष सभा होती. या सभेत सर्वांना मनसोक्तपणे बोलता आल्याने साडेतीन तास सभा सुरू होती. अलीकडच्या काळात साडेतीन तास सभा सुरू राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. नगरसेवक गौतम साळवे हे गावाच्या विकासावर तब्बल अर्धा तास बोलत होते, तर ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया हेदेखील अर्ध्या तासाच्यावर बोलले. त्यामुळे सर्व सभासदांत समाधान व्यक्त केले जात होते. गेल्या पंचवार्षिक कालावधीत नागरिक हित संरक्षण मंडळाची एकहाती सत्ता असल्याने कुणालाही जादा बोलू दिले जात नसायचे. त्यामुळे एक प्रकारे हुकूमशाहीच होती. मात्र, सध्या कोणाचीही एकहाती सत्ता नाही. त्यामुळे नगर परिषदेत हुकूमशाहीऐवजी लोकशाहीचे पर्व सुरू झाले असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
>ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले, की ठेकेदाराला आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यामुळे तो कामचुकारपणा करीत असतो. नगरसेवक मोहन नारंग म्हणाले, की आरोग्याधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. या वेळी मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात म्हणाले, की साफ करून निघून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा.
>नगरसेवक गौतम साळवे म्हणाले, की शहरात मोकाट जनावरांचा मोठा प्रश्न आहे. तेव्हा कोंडवाड्याची तरतूद झाली पाहिजे. कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे, ते तातडीने काढले पाहिजे.
नगरसेवक जीवराज पवार म्हणाले, की हार-तुऱ्यांवर लाखो रुपयांचा खर्च झालेला आहे. हा खर्च कमी झाला पाहिजे. हार-तुऱ्यांवर लाखोंचा खर्च परवडणारा नाही. शेवटी पैसा जनतेचा आहे.
नगरसेविका रिजवान पानसरे म्हणाल्या, की नगरमोरी परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे ही जनावरे पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. परिणामी, अपघातदेखील झाले आहेत. तसेच, प्रभाग क्र. १ मध्ये पाणी कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे पाण्याची टंचाई आहे.
नगरसेविका संध्या डावखुरे म्हणाल्या, की नगर परिषदेने अवास्तव खर्चावर मर्यादा आणाव्यात. जनतेचा पैसा आहे. याची उधळपट्टी करू नये.