शेतीसह सर्वांगिण विकास साधणारा अर्थसंकल्प : कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 05:58 PM2018-03-09T17:58:32+5:302018-03-09T17:58:32+5:30
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प शेती क्षेत्रासह राज्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे व्यक्त केली.
मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प शेती क्षेत्रासह राज्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे व्यक्त केली.
फुंडकर म्हणाले की, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या प्रकल्पांना ८ हजार २३३ कोटी रुपयांची तरतूद व जलयुक्त शिवार योजनेसाठी १ हजार ५०० कोटी अशी भरीव तरतूद तसेच सेंद्रीय व शाश्वत शेतीला चालना मिळण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाशी संबंधित योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करुन अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र कसा प्रगतीकडे जात हे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीत मोलाचा योगदान देणारा अर्थसंकल्प असून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या दूरदृष्टीचे द्योतक या अर्थसंकल्पातून दिसते. विदर्भात संत्रा उत्पादन वाढ व प्रक्रियेसाठी सायट्रस इस्टेटची स्थापना ही महत्वपूर्ण योजना, त्याचप्रमाणे फळबाग योजना आणि वनशेती व पडीक जमिनीवरील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणारी योजनांचा समावेश करण्ययात आला आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी तरतूद केल्याने शेतक-याला न्याय देणारा, शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द असणारा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला थेट शासनाशी जोडणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रियाही फुंडकर यांनी व्यक्त केली.