Maharashtra Budget : अर्थसंकल्प हा सामान्य जनतेसाठीचा 'जनसंकल्प' - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 06:36 PM2023-03-09T18:36:49+5:302023-03-09T18:42:48+5:30
Chandrakant Patil : हा सामान्य जनतेसाठीचा 'महाअर्थसंकल्प' आणि 'जनसंकल्प' असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मुंबई : सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर केला. हा सामान्य जनतेसाठीचा 'महाअर्थसंकल्प' आणि 'जनसंकल्प' असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
या अर्थसंकल्पात बार्टी, सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) विभागीय कार्यालय नाशिक येथे उभारण्यात येणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
याचबरोबर, विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ,नागपूर; शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था,अमरावती; कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे; गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर; डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई; लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थांना अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पुण्यातील भिडे वाडा स्मारकासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच, उच्च शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाख ११ हजार रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन राज्याला समृद्ध करणारा विकासाचा महाअर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.