नव्या ‘मनोरा’चे बजेट १००० कोटी, मुख्यमंत्र्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:24 AM2018-03-11T04:24:38+5:302018-03-11T04:24:38+5:30
‘मनोरा’ आमदार निवास नव्याने बांधले जाणार असून, त्याचे बजेट १००० कोटींचे आहे. ४५ माळ्यांचा हा टॉवर मुंबईच्या समुद्रकिना-यावरील पहिली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणार आहे.
- राजेश निस्ताने
मुंबई - ‘मनोरा’ आमदार निवास नव्याने बांधले जाणार असून, त्याचे बजेट १००० कोटींचे आहे. ४५ माळ्यांचा हा टॉवर मुंबईच्या समुद्रकिना-यावरील पहिली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणार आहे.
राज्य सरकार लवकरच कामाचा नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) सोबत ‘एमओयू’ करणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधिमंडळ अध्यक्ष, सभापतींच्या उपस्थितीत आढावा घेतला.
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांची नाराजी तर नाही ना, असा सूरही ऐकायला मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या याच बैठकीत ‘मनोरा’ची नवीन इमारत नेमी कशाप्रकारची असेल, याचे प्रेझेन्टेशन मुंबईतील एका नामांकित आर्किटेक्चरने सादर केले. ‘पुणे कनेक्शन’मधून त्या आर्किटेक्चरवर ‘प्रभू’कृपा होण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
शुल्कासाठी ओढाताण
‘मनोरा’ बांधकाम प्रक्रिया व अंमलबजावणीपोटी ‘एनबीसीसी’ ६.२५ टक्के शुल्क घेणार आहे. त्यातून आर्किटेक्चरलाही शुल्क दिले जाणार आहे. मात्र, ते किती असावे, यावर एकमत झालेले नाही. या शुल्कावरून ‘एनबीसीसी’ व आर्किटेक्चर यांच्यात टक्केवारीची ओढाताण सुरू असली, तरी ते २० कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
परवानगीसाठी कसरत
मुंबईतील समुद्रकिनारी तब्बल ४५ माळ्यांची नवी ‘मनोरा’ ही पहिलीच इमारत असेल. त्यामुळे त्याला विविध परवानग्या मिळविण्याचे आव्हान ‘एनबीसीसी’ पुढे राहणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्यक्ष बांधकामाला किमान चार वर्षे लागतील, अशी शक्यता सूत्रांनी बोलून दाखविली.