‘वित्तीय शिस्तीला बळकटी देणारा अर्थसंकल्प’
By admin | Published: February 4, 2017 02:00 AM2017-02-04T02:00:13+5:302017-02-04T02:00:13+5:30
केंद्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा वित्तीय शिस्तीला अधिक बळकट करणारा आणि नोटाबंदीला चोख उत्तर देऊन नव्या वातावरणाकडे नेणारा
मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा वित्तीय शिस्तीला अधिक बळकट करणारा आणि नोटाबंदीला चोख उत्तर देऊन नव्या वातावरणाकडे नेणारा ठरला आहे, त्याचबरोबर यातून दीर्घकालीन परिणाम साधत वित्तीय तूट ३.२ इतक्या प्रमाणात कमी होणार आहे, असा विश्वास खासदार व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचे विश्लेषण करण्याचा उपक्रम गेली चार वर्षे आयोजित करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा, शेती, रेल्वे, ग्रामविकास यांना प्रामुख्याने विकासाच्या बाबतीत चालना देण्याचे कार्य या अर्थसंकल्पाने केले. त्यामुळेच प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग वित्तीय तुटीचा आकडा कमी करण्यावर तसेच राष्ट्रीय उत्पन्नात अधिक भर टाकण्यासाठी होणार आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती खोटी ठरवीत त्याचे परिणाम १ एप्रिलपासून सकारात्मकरीत्या दिसतील, असा आशावादही डॉ.नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)