आवाजावरून म्हशीनेच ओळखला आपला मालक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:20 AM2019-02-25T06:20:43+5:302019-02-25T06:20:49+5:30
जामनेर पोलिसांची अनोखी शक्कल : दोन जणांनी केला होता हरविलेल्या म्हशीवर दावा
जळगाव : सव्वा वर्षापूर्वी हरविलेली म्हैस संबंधित मालकाला गावातच दिसली. मात्र सध्या ही म्हैस ज्याच्याकडे आहे, तोदेखील म्हशीवर दावा सांगू लागला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले, तेव्हा जामनेर पोलिसांनी चातुर्य दाखवित आवाजावरून ही म्हैस ज्याच्याकडे गेली, त्या मालकाकडे ती सोपविली.
येथील कुंदन विलास सुरवाडे (रा. भिमनगर, जामनेर) यांच्या मालकीची मोहरा जातीची म्हैस १८ नोव्हेंबर २०१७ रोजी हरविली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली. मध्यंतरी त्यांना याच वर्णनाची म्हैस गोकूळ कडू पिसे (रा.दामले प्लॉट, जामनेर) यांच्याकडे आढळली. त्या वेळी त्यांनी आपली हरविलेली म्हैस दामले प्लॉट मध्ये असल्याचा दावा करीत परत मिळवून देण्याची मागणी केली.
पोलिसांनी दामले प्लॉट मधून म्हैस पोलीस ठाण्यात आणली व सुरवाडे व पिसे दोघांना साक्षीदारांसह बोलविले. दोघेही म्हैस आपलीच असल्याचे सांगत असल्याने पोलिसांसमोर पेच उभा राहिला. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी एक अनोखी शक्कल लढविली. त्या म्हशीला एका कोऱ्यात उभे केले व विरुध्द दिशेला पिसे व सुरवाडे यांना उभे केले आणि म्हशीला आवाज द्यायला सांगितले. आवाज दिल्यावर म्हैस ज्याच्याकडे जाईल तोच खरा मालक त्यानुसार दोघांनी दिलेल्या आवाजानंतर म्हैस पिसे यांच्यामागे येत त्यांच्याजवळ येऊन थांबली. अखेर पोलिसांनी ही म्हैस पिसे यांना सोपविली.
पुरावे सादर करा
यानंतरदेखील म्हशीच्या मालकी हक्काबाबत कुणाकडे काही पुरावे असतील तर ते दोन दिवसांत सादर करण्याचे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.