धाडस की प्रेम म्हणावे? गुराख्यावर वाघाचा हल्ला झाला, म्हशींनी वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 08:02 AM2020-09-22T08:02:33+5:302020-09-22T08:04:38+5:30
समोरच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केली असता सर्व म्हशी एकत्र गोळा झाल्या आणि त्या वाघावर चालून गेल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील खरकाडा येथील जनावरे चराईसाठी सोडून बसलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार चरत असलेल्या म्हशींना दिसताच सर्व म्हशींनी एकत्र येत वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे वाघ भांबावला आणि त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामध्ये गुराखी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. किशोर विजय भोंडे (३०) असे जखमी गुराख्याचे नाव आहे. किशोर हा नेहमीच बैल, म्हशी खरकाडा जंगल परिसरात चराईसाठी नेत असे. रविवारीसुद्धा जनावरे चराईसाठी सोडून तो मोकळ्या जागेवर उभा होता. समोरच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केली असता सर्व म्हशी एकत्र गोळा झाल्या आणि त्या वाघावर चालून गेल्या. त्यामुळे भांबावलेल्या वाघाने किशोरला सोडून दिले आणि जंगलात पळ काढला.
या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत