राज्यात ११ लाख घरे बांधणार
By admin | Published: July 6, 2015 12:42 AM2015-07-06T00:42:45+5:302015-07-06T00:53:32+5:30
रवींद्र वायकर यांची माहिती : शिवाजी विद्यापीठाच्या निधीचा प्रश्न सोडवू
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार राज्यातील गोरगरिबांना परवडणारी अकरा लाख घरे बांधून देणार असल्याची माहिती गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी विद्यापीठाचा प्रलंबित सुवर्णमहोत्सवी निधीबाबत प्रस्ताव आलेला नाही, आल्यानंतर तो निश्चितच सोडवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
रवींद्र वायकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा निर्धार केला आहे. जुन्या गृहनिर्माण धोरणांत बदल केला असून झोपडपट्टी होणार नाहीत, ‘म्हाडा’च्या माध्यमातून गरिबांसाठी अकरा लाख घरे देण्याचे उद्दिष्ट आहे. उच्चशिक्षण विभागातील जवळपास ५१ हजार जागा शिल्लक आहेत. त्याला विनाअनुदानित कॉलेजची संख्या जबाबदार आहे.
शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्ष निधीचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही, आल्यानंतर तत्काळ सोडवू. भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत विचारणा केली असता, भाजप वेगळा पक्ष आहे, त्यांची धोरणे वेगळी आहेत. संबंधित मंत्र्यांवर अजून दोषारोप सिद्ध झालेला नाही, त्यांच्याबाबत भाजपच स्पष्टीकरण देईल, असेही वायकर यांनी सांगितले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘प्रभाग तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ उपक्रम राबविला आहे, त्यामुळे महापालिकेवर भगवा निश्चितच फडकेल. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वर्गवाढीस बंदी चुकीची
तंत्रविभागाच्या जागा रिक्त राहतात, म्हणून नवीन वर्ग व कॉलेज यांना परवानगी नाकारली जाते. हे योग्य नाही, वाणिज्य व सायन्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने त्यांची संख्या वर्षाला वाढत आहे. यासाठी उच्चशिक्षण विभागाच्या वर्गवाढीस सरसकट बंदी घालणे चुकीचे असून याबाबत मुख्यमंत्री, तंत्रशिक्षण मंत्री व सचिवांशी चर्चा झाल्याचे वायकर यांनी सांगितले.
पक्षप्रमुखच बक्षीस देतील
आमदार राजेश क्षीरसागर यांनी भगव्या सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी शहरात आक्रमकपणे काम केल्याचे राज्यमंत्री वायकर यांनी सांगितले. त्यावर त्यांना शाबासकी कधी देणार, असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्याकडे वरिष्ठांचे लक्ष आहे, त्यांचे कार्य पाहून त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निश्चितच बक्षीस देतील, असे वायकर यांनी सांगितले.