सकारात्मक पिढी घडवा
By admin | Published: August 5, 2014 01:06 AM2014-08-05T01:06:23+5:302014-08-05T01:06:23+5:30
प्रत्येक पिढीसमोरील समस्या व आव्हाने निरनिराळी असतात. या समस्यांचे निवारण योग्य नियोजन व सुयोग्य बुद्धिमत्तेतून होणे सहज शक्य आहे. त्याकरिता एकीकरण, जागतिक योग्यता
जे. एन. पटेल : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९१ वा वर्धापनदिन साजरा
नागपूर : प्रत्येक पिढीसमोरील समस्या व आव्हाने निरनिराळी असतात. या समस्यांचे निवारण योग्य नियोजन व सुयोग्य बुद्धिमत्तेतून होणे सहज शक्य आहे. त्याकरिता एकीकरण, जागतिक योग्यता आणि नेतृत्वगुण या गुणांचा विद्यार्थ्यांमध्ये अंतर्भाव होणे आवश्यक आहे. विद्यापीठातून सकारात्मक पिढी बाहेर पडावी यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (सेवानिवृत्त) जे.एन.पटेल यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९१ व्या वर्धापनदिन सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.कृष्णा कांबळे व विधीतज्ञ डॉ.थ्रिटी पटेल या मान्यवरांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सोमवारी हा सोहळा पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवसाधना पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा शाल, मानपत्र, ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जे.एन.पटेल यांनी आपल्या भाषणादरम्यान विद्यापीठाकडून समाजाच्या फार अपेक्षा असून जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी हितासाठी प्रयत्न करण्यात यायला पाहिजे असे मत व्यक्त केले. सोबतच त्यांनी पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलेल्या मान्यवरांचे कार्य हे समाजाला दिशादर्शक असल्याचेदेखील प्रतिपादन केले.
नागपूर विद्यापीठाला गौरवशाली इतिहास लाभला आहे. विद्यापीठासमोर सध्या काही अडचणी नक्कीच निर्माण झाल्या आहेत. यासाठी पुनरावलोकन आणि भविष्यवेध करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठाच्या ‘पीएचडी’चा मान खालावतो आहे.
विद्यापीठाला जुना गौरव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे असे आवाहन नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी केले. या कार्यक्रमाला आयोजन समितीचे अध्यक्ष व प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या निरनिराळ््या प्राधिकरणांचे अधिकारी, सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
विद्यापीठ आणि बजाज समूहात सामंजस्य करार
या सोहळ््यादरम्यान बजाज समूह व नागपूर विद्यापीठादरम्यान नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या निर्माणासाठी सामंजस्य करार करण्यात आला. बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ अंतर्गत (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) यासाठी १० कोटी रुपये देण्याची तयारी दाखविली आहे. विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे तर बजाज समूहातर्फे संजय भार्गव यांनी या करारावर हस्ताक्षर केले. संजय भार्गव यांनी यावेळी ५० लाख रुपयांचा चेकदेखील विद्यापीठाला सोपविला.
बजाज समूहाचे विदर्भासोबत फार जुने नाते आहे. त्यामुळे गौरवाशाली परंपरा लाभलेल्या या भूमीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी जुळल्याचा आनंद आहे. उद्योग व समाज हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा हा आमचा उद्देश आहे असे भार्गव म्हणाले.
बजाज कंपनीकडून ‘सीएसआर’ अंतर्गत येऊ घातलेल्या या निधीच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठ नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणार आहे. याचे नाव जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर असे करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने अगोदरच मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)
निबंध स्पर्धेतील विजेते
प्रज्ञा लांडे, सुभाष पाखमोडे, अजिंक्य भांडारकर, अश्विनी वैद्य, सोनिया तायडे, जया मेहर, आशिष थूल, प्रियंका गौळकर, स्वप्नील तुपे, देवयानी मोहगावकर, पायल उमक, भाग्यश्री गाडगे, अंकिता मोरे.
रसिकांनी घेतला संगीतसंध्येचा आस्वाद
९१ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे संगीतसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या सुश्राव्य गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. नियोजित वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ऐनवेळी हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर येथे घेण्यात आला. तरीदेखील रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून संगीतसंध्येचा आस्वाद घेतला.