शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक उभारू

By admin | Published: February 20, 2016 01:04 AM2016-02-20T01:04:58+5:302016-02-20T01:04:58+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक येत्या काळात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर येथे केली.

Build a world-renowned memorial of Shivrajaya | शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक उभारू

शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक उभारू

Next

आपटाळे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जागतिक कीर्तीचे स्मारक येत्या काळात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर येथे केली.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी शिवनेरभूषण पुरस्कार डॉ. मनोहर डोळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, नगराध्यक्ष राणी शेळकंदे, पंचायत समिती सभापती संगीता वाघ आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘गेली पंधरा वर्षे छत्रपतींचे स्मारक अरबी समुद्रात करू, अशा वल्गना करण्यात आल्या. मात्र छत्रपतींच्या विचाराने चालणारे आमचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाबाबतच्या सर्व परवानग्या आम्ही घेतल्या. या कामाचे टेंडर काढले आहे. लवकरात लवकर भूमिपूजन करण्यात येणार आहे.’’
छत्रपती शिवरायांनी जनतेला स्वाभिमानाने जगण्यास शिकविले. सामान्य माणसांचे रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श घेऊन आम्ही राज्यकारभार करीत आहोत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वप्नातील राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजनेतुन आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे.’’
भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, तो छत्रपतींच्या दूरदृष्टीतून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण करू, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जनतेने विश्वासाने आमच्या हातात सत्ता दिली आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.
शिवनेरी ते लेण्याद्री रोपवे, पर्यटनासाठी चालना मिळावी. या परिसरात ४५० लेण्या आहेत, त्यांचे संवर्धन व्हावे, जुन्नर तालुक्यातील सात किल्ल्यांचे संवर्धन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आराखडा तयार करा. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही ते म्हणाले

Web Title: Build a world-renowned memorial of Shivrajaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.