बांधकाम व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा
By admin | Published: July 9, 2014 12:55 AM2014-07-09T00:55:03+5:302014-07-09T00:55:03+5:30
कर्नाटकमध्ये १६ कोटींच्या बांधकामाचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून बेंगळुरूतील एका बंटी-बबलीने नागपूरच्या बांधकाम व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा घातला. रविशंकर तुमकुर संगन्ना
१६ कोटींच्या कंत्राटाचे आमिष : बेंगळुरूतील बंटी-बबली पसार
नागपूर : कर्नाटकमध्ये १६ कोटींच्या बांधकामाचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून बेंगळुरूतील एका बंटी-बबलीने नागपूरच्या बांधकाम व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा घातला. रविशंकर तुमकुर संगन्ना (रा. इंदिरानगर, बेंगळुरू) आणि बिट्टी श्रीदेवी ऊर्फ बोंलू तिमेयन श्रीदेवी (रा. आचल शेट्टी लेआऊट बेंगळुरू) अशी या बंटी-बबलीची नावे आहेत.
वर्धा मार्गावरील राजीवनगरात श्रीकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ही बांधकाम व्यावसायिक फर्म आहे. २००८ मध्ये कर्नाटकातील श्रीदेवी प्रोजेक्ट प्रा. लि. या संस्थेने बेंगळुरूतील जुन्या बसस्थानकामागे निवासी प्रकल्प उभारण्याच्या बांधकामाचे कंत्राट देण्याची जाहिरात केली. त्यामुळे श्रीकॉन इन्फ्राच्या संचालकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. श्रीदेवी आणि रविशंकरसोबत ओळख झाल्यानंतर या बांधकामाचे कंत्राट १५ कोटी, ७५ लाखांमध्ये करण्याचा करार श्रीदेवी प्रोजेक्ट आणि श्रीकॉन इन्फ्रामध्ये झाला. अर्धवट बांधकाम सोडू नये म्हणून श्रीकॉनच्या संचालकांना ३ कोटी, ३० लाख रुपये सुरक्षा ठेव मागितली.
श्रीकॉनच्या संचालकांनी ते श्रीदेवी प्रोजेक्टकडे जमा केले. २००८ मध्ये हे सर्व पार पडले. त्यानंतर श्रीकॉनच्या संचालकांनी बांधकामाची तयारी केली. मात्र, श्रीदेवी प्रोजेक्टचे संचालक (बंटी बबली) वेगवेगळी कारणे सांगून टाळू लागले.
तब्बल चार वर्षे टाळाटाळ करणारे बंटी बबली सुरक्षा ठेवही परत करायला तयार नव्हते. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीकॉनच्या संचालकांनी हे प्रकरण कोर्टात नेले. कोर्टाने दोन्ही बाजू तपासल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून आणि श्रीकॉनचे व्यवस्थापक अमित मधुकरराव पोंगुलवार यांच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री सोनेगावचे एपीआय बी. एन. दायमा यांनी श्रीदेवी प्रोजेक्टचे संचालक श्रीदेवी आणि रविशंकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्या शोधासाठी लवकरच सोनेगावचे पोलीस पथक कर्नाटककडे जाणार आहे. (प्रतिनिधी)