इमारत कोसळून ८ ठार
By admin | Published: August 8, 2016 06:06 AM2016-08-08T06:06:48+5:302016-08-08T06:06:48+5:30
भिवंडीत हनुमान टेकडी रोडवरील जुनी आणि पालिकेने अतिधोकादायक जाहीर केलेली महादेव बिल्डिंग रविवारी सकाळी कोसळल्याने घरमालक आणि त्यांच्या पत्नीसह
वज्रेश्वरी/भिवंडी : भिवंडीत हनुमान टेकडी रोडवरील जुनी आणि पालिकेने अतिधोकादायक जाहीर केलेली महादेव बिल्डिंग रविवारी सकाळी कोसळल्याने घरमालक आणि त्यांच्या पत्नीसह आणखी एका कुटुंबातील सहा जण अशा एकूण आठ जणांचा बळी गेला. तर एक जण जखमी झाला आहे. इमारत कोसळण्याची भिवंडीतील आठवडाभरात दुसरी घटना आहे.
हनुमान टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव ही ३५ वर्षे जुनी तीन मजली इमारत होती आणि महापालिकेने ती अतिधोकादायक ठरवून तिचे वीज-पाणी तोडले होते. त्यानंतरही, या इमारतीत आठ कुटुंबे राहत होती. या इमारतीचा पश्चिमेकडील भाग कोसळला. न कोसळलेल्या भागातील सहा कुटुंबांना वेळीच बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. इमारतीच्या तळमजल्यावर एक भोजनालय, मोबाइलची दोन दुकाने आणि इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान होते. भोजनालयातील अशरफ अन्सारी (३८) हा जखमी झाला आहे.
सज्जनलाल गुप्ता यांना पालिकेने दोन वेळा नोटीस दिली होती. त्यानंतर, मालक आणि भाडेकरूं ची शुक्र वारी बैठक झाली होती. त्यात त्यांनी भाडेकरूंना घरे सोडण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी घरे शोधण्यास सुरुवात केली होती. परंतु, भाडेकरू पागडी पद्धतीने खूप वर्षांपासून राहत असल्याने त्यांनी मालकाकडून घरांच्या ताब्याबाबत लेखी हमी मागितली होती. परंतु, मालक आणि त्याच्या भाऊ-बहिणींत मालमत्तेचा वाद असल्याने त्यांना लेखी हमी देता येत नव्हती. त्यात वेळ जात होता. अखेर, इमारतीची अवस्था पाहून रविवारी घरे रिकामी करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला होता. त्यांनी घरे सोडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मृत रहिवासी : या इमारतीचे मालक सज्जनलाल महादेव गुप्ता (६०) आणि त्यांची पत्नी सत्यवती यांचे मृतदेह सकाळीच सापडले. तर संध्याकाळी दुसऱ्या कुटुंबातील धनीराम ठाकूर (४५), त्यांची पत्नी रेखा (३८), मुलगी शिवानी (१३), मुलगा देवेश (९), नैतिक (३) आणि आई सोममणी (६०) यांचे मृतदेह सापडले.
भिवंडीतील १७ अतिधोकादायक इमारतींपैकी सात इमारतींतील रहिवाशांना बाहेर काढले आहे. इतर इमारतींतील रहिवाशांना काढण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सांगितले. त्यासाठी महसूल विभाग आणि पोलिसांचीही मदत घेण्यात येईल. उरलेल्या इमारतींचेही वीज-पाणी तोडण्यात येईल. त्याचवेळी त्यांना भोगवटा प्रमाणपत्रही दिले जाईल.
भाडेकरूंना प्रमाणपत्र
भिवंडीत आठवडाभरात लागोपाठ दोन इमारती कोसळल्याने उरलेल्या अतिधोकादायक इमारतीतील भाडेकरूंना विश्वासात घेण्याची गरज आहे. त्यांच्या ताब्यातील क्षेत्रफळ, किती वर्षांपासून राहत आहेत त्याच्या तपशीलासह भाडेकरूंना तत्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. घरे सोडलेल्या भाडेकरूंना नवीन इमारतीत हक्काची जागा दिल्यानंतरच त्या इमारतीच्या पुनर्विकासास परवानगी देण्याचे आदेश पालिकेलाही दिले आहेत.
यंत्रणा कार्यान्वित
घटनास्थळी महानगरपालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह ३० ते ३५ कर्मचारी, तीन जेसीबी, पाच डम्पर, पोकलेन यांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम आणि मदतकार्य सुरू होते. नंतर, सकाळी १० च्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राचे पथक (एनडीआरएफ) पोहोचले. त्यांनी ४० जवान आणि श्वान पथकासह शोध सुरू केला. घटनास्थळी सर्वांत आधी महानगरपालिकेचे आयुक्त
ई. रवींद्रन आले. नंतर, तहसीलदार वैशाली लंभाते, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदी पोहोचले.